भजनी मालिका

भजने

नामपाठें गोरा कुंभार तरला । उद्धार तो झाला पूर्वजांचा ॥१॥ नामपाठ कीर्ति गाताती वैष्णव । धन्य तो अपूर्व नाममहिमा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें जनाबाई बरोबरी । दळी कांडी हरि शेणी वेंची ॥१॥ भक्तांचे सकळ कार्य तें करणें । नये ऐसें उणें करी काम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठे ज्ञान नामपाठें ध्यान । नामपाठे मन स्थिर होय ॥१॥ जगांत हें सार नामपाठ भक्ती । आणिक विश्रांती नाहीं नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें ज्ञानियाची भिंत ओढी । भाविका तांतडी देव धांवे ॥१॥ बोलविला रेडा केलेंस कवित्व । नामपाठे मुक्त केलें जन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें तरला चोखा तो महार । भावें सर्वेश्वर स्थापीं तया ॥१॥ नामपाठ करुनि कीर्ति केली जगीं । उपमा तें अंगीं वाढविली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें तारिलें पतित उद्धरिले । धांवणे तें केलें पांडवांचें ॥१॥ पडतां सकंटीं नामपाठ गाय । द्रौपदींती माय तारियेली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें नक्र तारिला निर्धारें । गजेंद्र उद्धरे नामपाठे ॥१॥ तरले तरले नामेंचि तरले । वैकुंठासी नेले नामपाठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें नामा शिंपी तो तरला तयाची देवाला आवड मोठी ॥१॥ जाऊनी जेवणें उच्छिष्ठ भक्षणें । नामपाठें देणें इच्छिलें तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें निवृत्ति ज्ञानदेवा उपदेशी । ओहं सोहं कोहं साक्षी केले ॥१॥ तिन्हीपरता बोध तयासी बोधिला । नामपाठें झाला शांतरुप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें निवृत्ति पावला विश्रांती । नामपाठें शांति कर्माकर्मीं ॥१॥ म्हणोनि प्रेमभावें नामपाठ गावें । आलिंगन द्यावें संतचरण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें बिभीषण सर्वांस वरिष्ठ । वंश तो स्पष्ट देशोधडी ॥१॥ जाउनी शरण चिरंजीव झाला । नामपाठें धाला कल्पवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठे भक्ति हनुमंतें केली । सेवा रुजू झाली देवा तेणें ॥१॥ नामपाठें शक्ति अद्‌भुत ये अंगी । धन्य झाला जगीं कपीनाथ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें भीष्में कामातें जिंकीलें । सार्थक पैं केलें विहिताचें ॥१॥ आदरें आवडी नामपाठ गावें । सर्वावरी होय सत्ता त्याची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें मधुसुदन वाचे । अनंत जन्माचें दोष जाती ॥१॥ मधुनामे जैसा मोक्षकेशी वेधु । तैसा तूं बोधूं धरीं देहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें मुक्त मुक्ताई पैं झाली । हृदयीं आटली नामपाठें ॥१॥ देहादेहे सर्व निरसिले चार्‍हीं । नामपाठ वरी मुक्त झाले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें मोक्ष पाविजे तत्त्वतां । आणिक तें आतां साधन नाहीं ॥१॥ नामपाठ सार नामपाठ सार । न करी विचार आणिक दुजा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठे युक्ती साधन समाप्ती । नोहे दुजी प्रीति नामपाठें ॥१॥ आणिक खटपट कासया बोभाट । नामपाठ वाट वैकुंठाची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें वर्म वेदींचें तें कळे । नाम पाठबळें शास्त्रबोध ॥१॥ या दोहींचेंवर्म ज्ञानदेवी जाणा । जपें कां रे जना हृदयीं सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें वामन अक्षरें तीं तीन । आणिक योगसाधन आन नाहीं ॥१॥ वदे तूं वामन वदे तूं वामन । विषय वमन करुनि सांडि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें संत पावले विसांवा । आणिक नाहीं ठेवा दुजा कांहीं ॥१॥ नामपाठें सिद्धि येईल हातां । मोक्षमार्ग तत्त्वतां नामपाठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ