भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

या परी करुनियां त्याची गती । निजधामा पाठविला श्रीपती । लोकही विस्मय पावोनि चित्तीं । न कळे म्हणती हरिलीळा ॥१॥ हाचि ईशाचाही ईश । जगाचा आदी हा जगदीश । येथें दिसतो । मानुशवेश । परि हा अध्यक्ष भुवनत्रया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याचा आश्रय झाला आम्हां । या पुरुषोत्तमा विठठलाचा ॥१॥ गातां वाचितां चरित्रें याची । न करी दासांची उपेक्षा हा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याचि अनुष्ठानें ध्रुव आणि प्रल्हाद । भोगिताती पद वरिष्ठ तें ॥१॥ जेथें नाहीं होणें निमणें संसारा । काळाचा आडदरा अनोळख ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याचिया ध्यानें हें चराचर । अवघें तदाकार मज भासे ॥१॥ मही अंबु मारुत गगन । भासे हुताशन हाचि झाला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याचिलागीं तुमचा करितसें धांवा । रात्रंदिवस देवा आळवूनि ॥१॥ नेणें जप तप स्नान संध्या विधी । जड माझी बुध्दि प्रज्ञाहीन ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याचिलागीं परांगना । मानिती हुताशनापरी ज्ञाते ॥१॥ जवळी गेल्या जाळूं शके । म्हणोनि धाकें पळती त्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याचिलागीं वो त्यजियलें भोग । याचिलागीं वो केले नाना याग । याचिलागीं वो अष्टांगादी योग । याचिलागीं या विषयांचे त्याग वो ॥१॥ जन्माजन्मांतरी केली हे सूचना । याचिलागीं वो वसविलें निर्जना । भक्षूनि फळ मूळ प्राशिले जीवना याचिलागीं केलें तीर्थाटना वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

याच्या संगसुखें गर्भवास घेतां । येत जात गे कल्पाच्या चळथा । नेघो भुक्ति मुक्ति देतां सायुज्यता । ऐशा गौळणी त्या सुखानंदभरिता वो ॥१॥ धन्य प्रेमळा त्या रंगल्या श्रीरंगी । नेणती दुसरें वों संसारी विरागी । हरिचीं भूषणें त्या लेऊनि निजांगी । सुखी सुखरुप भोगी नित्य त्यागी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यात्रा फिरोनियां माघारी । आली गोकुळाभीतरी । उव्देग करिती घरोघरीं । म्हणती अनर्थ् वोढवलां ॥१॥ इंद्र कोपलियावरी । अणुमात्रही वृष्टी न करी । बरग पाडूनियां दारीं । उरों नेदील शेंपूट ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी आपण वृक्षातळीं । जाऊनियां वरी न्याहाळि । तंव ते म्हणती अरे वनमाळी । आतुर बुध्दि करुं नको ॥१॥ येथे हा आघाताचा ठावो । नेणसि तूं त्याचा भावो । अणुमात्र निसरतां पावो । होईल निर्वाहो जिवित्वाचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी कंस भयाभीत । कृष्णभयें उव्दिग्नचित्त । बैसला असतां निजमंदिरांत । तंव आला अकस्मात रजक बळिया ॥१॥ वस्त्रें आणिलीं घोवट । उंच धोऊनियां चोखट ॥ म्हणे राया राय तूं वरिष्ठ । शोभती विशिष्ट तुज अंगीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी कंस म्हणे दैत्यादिकां । वधूनि येईल जो बाळका । त्यासी अर्ध राज्याची टीका । दूईन छत्र सिंहासन ॥१॥ मग तृणावर्त धेनुकासुर । मग केशिया शकटासुर । अघासुर सर्पविखार । चालिले भार दैत्यांचे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा