भजनी मालिका

भजने

भावेंविण भक्ति कशानें हो करी । माया मोह वैरी देहामाजीं ॥१॥ तुझें नाम दिव्य रस जिव्हे स्वाद । नाश काम क्रोध करिती माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भावेवीण नाम घेता चिदंबर दगडावरी प्रजन्य तैसे जाणा ।। १ ।। भावामाजी दोन प्रकारीचे जाण । देहभान विदेहीभान जान ||२||

रचनाकार: संत विठाबाई

भावों देव कीं देवीं भाव । दोहींचा उगव करुनी दावा ॥१॥ भावा थोर कीं देव थोर । दोहींचा निर्धार करुनी दावा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भासतसे दोर विखाराचे परी । तैसीच थोरी प्रपंचाची ॥१॥ भुलले भुलले प्रपंची गुंतले । वाया उगले बोल कां हे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे । चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥१॥ बाप रे हा देवांचा ही देव कळों । नेदी माव काय करी करवी तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भिऊनि निघिजे समर्थाचे पोटीं । विषयांची तो भेटी नको मज ॥१॥ तैसा मी शरण आलों रे केशवा । मज त्वां राखावें पायांतळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भिक्षायापत्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऐसियासी नारायणें । उपेक्षीजे सर्वथा ॥१॥ देवा पायीं नाहीं भाव। भक्ती वरी वरी वाव । समर्पीला जीव । नाहीं तो हा व्यभिचार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भिक्षेलागीं पाणीपात्र । सांठवण उदर मात्र ॥१॥ सायंकाळीं प्रातःकाळासी । भिक्षा संग्रह नसावा निश्चयेंसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भिंगाचे भिगुलें खांद्यावर आंगुलें । नाचत तान्हुलें यशोदेचें ॥१॥ येती गौळणी करीती बुझावणी । लागती चरणी कान्होबाच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भिन्न माध्यान्हीं रात्रीं नारी । विरह करी बैसोनि अंतरीं । केधवा भेटले श्रीहरी । तो नवल जालें अंतरीं वो ॥१॥ अवचित घडला संतसंग । विरहाचा झाला भंग । तुटोनि गेला द्वैतसंग । फिटला जन्ममरणाचा पांग वो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भिन्न रात्रीं माध्यान्ही वो । सेजे सुदली नारी । आपआपणा विसरूनियां । सुशोभित अंधारीं ॥१॥ त्यामाजी चारी भुजा । शंख चक्र वो करीं । पद्म गदा हातीं शोभती । दिसे सर्व शृंगारीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भिल्लणीचीं फळें कैशीं । चाखोनी वाहातसे देवासी ॥१॥ भावें तिचीं अंगिकारी । सर्वांहुनी कृपा करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भिल्लिणी बाळा वनीं वेंचितां फळा । देखिला रामरावो ठक पाडिलें डोळां ॥१॥ गोडणी सोहंमार्गी गीती गाती रामा । आनंदें नाचती दृष्टी देखोनी रामा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भीड भीड जाय उडोनि लौंकिक । शेवटींचा रंक तोही दापी ॥१॥ दावितां तो तोंड लाजे भरले सभे । मग वाळे उभें सलचि जैसें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना न देखवे ॥१॥ आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुम्ही दातारा नेणां ऐसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होईल फळ धीर करावा ॥१॥ न करीं त्वरा ऐकें मात । क्षण एक निवांत बैसावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम