भजनी मालिका

भजने

मनासी खेचिलें मायेसी मोकलिलें । तें शस्त्र आपुलें सज्ज करी ॥१॥ यापरी सैरा होय कारणी । माया ममता दोन्हीं मारूनियां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मनासी निर्धार केलासे देखा । संतसंग सुखा आतुडलों ॥१॥ इच्छिलें पावलों इच्छिलें पावलों । इच्छिलें पावलों संतसंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मनासी स्थिरता नामें दत्त वेध । दुजा नाहीं छंद आणीक कांहीं ॥१॥ म्हणोनि संकल्प दृढ झाला पायीं । दत्तावाचुनी ठायीं नोहे कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मनीं जें जें देखें परी दृष्टी नेणें । प्रेमाची ते खूण जाणावया ॥१॥ काय करूं माय बाप गा विठ्ठला । मजसि कां अबोला धरिलासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥१॥ जातीचें तें झुरे येर येरासाठी । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मनींचा माझिया वो संदेह फिटला । देव पाहों जातां जवळींच भेटला । अवघा मागें पुढें तोचि वो ठाकला । जनीं जनार्दन भरोनियां दाटला वो ॥१॥ पुरलें जीवींचे आर्त साजणी । पाहें जेथें तेथें दिसे चक्रपाणी । लोकलोकांतरी त्याचीचि भरणी । भरोनि उरला अवघ्याचि वाणी खाणी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मनुष्य देहीं व्हावें ब्रह्मज्ञान । घेतो पुढीलें आमंत्रण ॥१॥ पुढें जन्माचा विसार । घेतों अतिमानें तो पामर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मनें कल्पोनियां केली विटंबना । हिंडविले रानां वासनेच्या ॥१॥ तैसें नका करूं वाउगें चिंतन । मन आकळुन कार्य करा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मनें ब्रह्मादिकां केलीसे थोकडी । तेथें परवडी कोण मानवाची ॥१॥ इंद्रिय न चाले मनाविण देखा । मनाची मनरेखा नुल्लंघवे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मनें हरीरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥ यांच्या भ्रतारांचीं धरूनियां रूपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम