भजनी मालिका

भजने

लाजलें गे माय आतां कोणा ओवाळूं । जिकडे पाहावें तिकडे चतुर्भुज गोपाळू ॥१॥ ओवाळूं मी गेलें माय गेले द्वारके । जिकडे पहावें तिकडे चतुर्भुज सारिखें ॥२॥

उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥ करा जयजयकार वाद्यांचे गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥

अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंख चक्र- गदापद्मसहित करीं ॥१॥ देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहतां वाटे गे माये ॥२॥

करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥ अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥ध्रु.॥

माझें चित्त तुझे पायीं । राहें ऐसें करीं कांहीं । धरोनियां बाहीं । भव तारीं दातारा ॥१॥ चतुरा तूं शिरोमणि । गुणलावण्याची खाणी । मुगुट सकळां मणि । तूं चि धन्य विठोबा ॥ध्रु.॥

ऐसी वाट पाहे कांहीं निरोप कां मूळ । कां हो कळवळ तुम्हां उमटेचिना ॥१॥ आवो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनियां आसे चाळवूनी ठेविलें ॥ध्रु.॥

बोलोनियां दाऊंकां तुह्मी नेणा जी देवा । ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेन ॥१॥ पांगुळलें मन कांहीं नाठवे उपाय । म्हणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥ध्रु.॥

कां गा किविलवाणा केलों दीनाचा दीन । काय तुझी हीन शक्ती जालीसी दिसे ॥१॥ लाज येते मना तुझा म्हणवितां दास । गोडी नाहीं रस बोलिली यासारिखी ॥ध्रु.॥

जळो माझें कर्म वायां केली कटकट । झालें तैसें तंट नाहीं आलें अनुभवा ॥१॥ आता पुढें धीर काय देऊं या मना । ऐसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥ध्रु.॥

जळोत तीं येथें उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥ आतां मज साह्य येथें करावें देवा । तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनि ॥ध्रु.॥

तुजसवें आम्हीं अनुसरलों अबळा । नको अंगीं कळा राहों हरी हीन देऊं ॥१॥ सासुरवासा भीतों जीव ओढे तुजिपाशीं । आतां दोहींविशी लज्जा राखे आमुची ॥ध्रु.॥

कामें नेलें चित्त नेदी अवलोकुं मुख । बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय ॥१॥ कां जी सासुरवासी मज केलें भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥ध्रु.॥

चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥ हें चि एक तुम्हां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि ॥ध्रु.॥

तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् झालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥ काय गा विठोबा तुज म्हणावें । शुभाशुभ गोड तुम्हां थोराच्या दैवें ॥ध्रु.॥

वाट पाहें वाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥ कई येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥