भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठोबा मला मूळ धाडा । धांवत येईन दुडदुडां

vithoba mala mul dhada | dhanvat yein dudadudan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
विठोबा मला मूळ धाडा । धांवत येईन दुडदुडां । चरणीं लोळेन गडबडा । माझा जीव झाला वेडा ॥१॥ कर ठेवूनि कटावरी । उभा राहिला विटेवरी । मुकुट घातला सरी । कलगी खोविली वरी ॥२॥ पितांबर नेसूनियां पिंवळा । गळां पैं तुळसीच्या माळा । कीं रुप सुंदर सांवळा । तेज झळके झळाळा ॥३॥ नामदेवाचें कौतुक । मला सांपडलें माणीक । विठोबा पाहुनी तुझें मुख । हारपली माझी तहान भूक ॥४॥ विठोबा तुझी संगत बरी । जैसा चंदन मैलागिरी । संत चालले पंढरी । निशाण पताका जरतारी ॥५॥ जसी मोहोळासी लुब्ध मासी । तसी तूं सखी माझी होसी । सुख दुःख सांगेन तुजपासी । माझा जीव होईल खुषी ॥६॥ काळी मध्यान रात्र झाली । फेरी विठ्‌ठलाची आली । जनी म्हणे चूक पडली । भेट नाहीं विठ्‌ठलाची झाली ॥७॥