भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझयांचा ठाव नरसी ब्राह्मणी

majhayancha thav narasi brahmani

रचनाकार: संत नागरी · अभंग
माझयांचा ठाव नरसी ब्राह्मणी । आठवत मनी रात्रीं दिवस ।। देखावया जीव तळमळीतो माझा | विठोबाची पूजा हरिकीर्तनी ।।१।। कोण जिवलग पुरवील माझी आस । प्राण कासावीस होतो माझा।।धृ।। विठोबा धणी कां न ये अझुणी । मज सोडऊनी न्यावयासी । कृपेच्या सागरें कां मज टाकिलें । काये मी चुकलें सेवाविधी ॥२॥ त्याचें श्रीमुख निर्मळ नयन कमळदळ । अनाथकृपाळ म्हणवीतसे। आजि कैसा धीर धरवलासे तया । निजकोवसया नारायेणा ॥३॥ मुगुट विराजित मोरपिसा वेठी । कुंडले गो (म) टी श्रवणपुटी ।। वोरसला भेटी के ये (ई) ल धावत। देखेन नाचत संतांमाजीं ||४|| पदक हृदयावरी वैजयंती माळा । सुकुमार सरळा बाहु त्याचे । जडित दशांगुळे साजिरी वीरकंकणे । तो केव्हा अभयदान देईल मज ॥ ५॥ सोनेसळा सेला कासे मालगांठी । चर्चियेली उटी चंदनाची ।। रुणझुणीत वाकी ब्रीदांना तोडर । त्रिभवनासुंदर देखेन केव्हा।।६।। कस्तुरीमळीवट रेखिला सुरेख । ब्रह्मांडनायक सुखसिंधु ।। लावण्यपुतळा तो माझा कैवारी । पाहेन घणीवरी केव्हा नयनी ।।७।। या रूपाची सवे लागलीसे नयना । जीवीचे गुज कोणा सांगो माझे ।। आंतीचा कळवळा अवस्तेची तळमळ । जाणे तो कृपाळ विठो माझा ||८|| ऐसी उत्कंठित जीवी मनाचेनि मने देहसुख । नेणे आठऊ नाही।। विठ्ठल विठ्ठल म्हणउनी सोकारिते धावा । देई चरणसेवा नागरीसी ।। ९॥