भजनी मालिका
← भजनांकडे परत

युक्तायुक्त ज्ञान वैराग्यसाधन । महातपोधन वरद योग्य

yuktayukta dnyan vairagyasadhan | mahatapodhan varad yogya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
युक्तायुक्त ज्ञान वैराग्यसाधन । महातपोधन वरद योग्य ॥१॥ आनंदाचा ओघ भक्तीचा सोहळा । हरि वेळोवेळां जपत वाचे ॥२॥ नित्य हें पूजन करी नामदेव । विठ्ठलीं हा भाव ठेवूनियां ॥३॥ नामयाची कांता क्रोधयुक्त बोले । भजन सोहळे तुम्हां गोड ॥४॥ परी हा नावडे संसाराचा संग । अखंड पांडुरंग चिंतितसां ॥५॥ तुमची हे गति लेकुरें नेणती । धान्य नाहीं नित्य भक्षावया ॥६॥ ऐसा हा वेव्हार तुमचा जी स्वामी । आतां पुसेन मी पांडुरंगा ॥७॥ माझिया संसारा घातलेंसे पाणी । नाचतो रंगणीं विठ्ठलाच्या ॥८॥ ऐसें देव तुझें अघटित मत । म्हणोनि रडत देवापुढें ॥९॥ देव म्हणे नाम्या अंगिकार इचा । करुनि देवाचा होईं सुखी ॥१०॥ नामा म्हणे देवा ऐका जी वचना । उबग कोण्या गुणें आला असे ॥११॥ राहो हे पंढरी सुखें नांद देवा । मज नाहीं हेव उणें कांहीं ॥१२॥ तुझिया कृपेचा अंकित मी होये । तुजविण आहे मज कोण ॥१३॥ माझिया संसारा पाडियेलें पाणी । काय आहे वाणी गति कोण ॥१४॥ ऐसें असुनियां उबग केशवा । माझ्या आला दैवा कोण्या गुणें ॥१५॥ जन्मापासोनियां सेवेसी लाविलें । निःसंतान केलें पांडुरंगा ॥१६॥ आतां मजलागीं लावियतां उद्वेगा । अगा पांडुरंगा मायबापा ॥१७॥ आतां मज म्हणसी संसार करावा । काय मी केशवा करुं आतां ॥१८॥ देवा ऐसी युक्ति उगा राहे आतां । समर्था केशिनाथा देवराया ॥१९॥ मागुनि अंतरीं विचार पैं केला । चित्तीं पैं सांचला क्रोध फार ॥२०॥ म्हणोनियां आतां विठो सुखें राहें । मुख तुज पाहे दाखविना ॥२१॥ देवाने चरण पहावयासाठीं । संसाराची तुटी करावया ॥२२॥ ऐसें मी करीन जाण विठ्‌‍ठोराया । पंढरिचे ठाया मोडवीन ॥२३॥ राहें नामीं आतां जाईन दूर देशा । भक्तीची हे आशा सोडोनियां ॥२४॥ जाईल भिंवरा जाईल पुंडलिक । जाईल सकळिक महिमा तुझी ॥२५॥ ऐसें बा विठ्ठला त्वां दुखविलें मज । सोडिना सहज पंढरितें ॥२६॥ उदास हें चित्त माझें जालें देवा । जाईन केशवा मायबापा ॥२७॥ आतां असों द्यावा लोभ हाचि देवा । समर्था केशवा मायबापा ॥२८॥ आपुल्या सांगातें नेईन पंढरी । नेईन संत नगरीं भीवराजन ॥२९॥ नेईन सांगातेंज महिमा येथिंची । मागें हेत हाचि धरुनि राहे ॥३०॥ चक्रतीर्थ आणि पद्माळें हें जाण । सर्वहि करीन आपणासी ॥३१॥ आपणचि तीर्थ आपणचि व्रत । आपण दीनानाथ होईन मी ॥३२॥ येथें हे पंढरी होती ऐसें लोक । म्हणतील देख पुढें देवा ॥३३॥ बोलोनियां ऐसें पुढें चाले नामा । मग आला प्रेमा पांडुरंगा ॥३४॥ पळतां पळतां नाटोपे जाणा । मागें देवराणा धांवतसे ॥३५॥ धांवतां धांवतां भागला केशव । उभा राहे तंव हात कटीं ॥३६॥ जें कां पंढरपूर वस्तीचें असणें । धरियेलें तेणें ठाणें पांडुरंगें ॥३७॥ तंव तो पळत लोळणीं घातली । त्या क्षणीं न बोले देवाशीं जो ॥३८॥ देव म्हणे नाम्या पाहे परतोन । तुज मी शरण आलों असे ॥३९॥ न करी उदास चाल तूं पंढरी । ऐसें बोले हरि नामयासी ॥४०॥ तंव नामा म्हणे ऐसें मी करीन । पंढरी नेईन भिवरें सहित ॥४१॥ मोडीन महिमा तीर्थींचा केशवा । कळे तुज तेव्हां भक्त ऐसा ॥४२॥ मग म्हणे विठ्ठल पुंडलिकासाठीं । चाल उठाउठीं पंढरिसी ॥४३॥ पितृभक्त पाहीं तोचि पुंडलिक । ऐसा भाव देख जाणिवेचा ॥४४॥ मग धरुनि मनगटीं चालविला नामा । मोठा आला प्रेमा विठोबासी ॥४५॥ ऐसें हें आख्यान सारुनियां देवें । मग आले भावें पंढरिसी ॥४६॥