भजनी मालिका
← भजनांकडे परत

यज्ञ याग दान व्रत उद्यापन । हें नेणें मी साधन काय करूं

yadnya yag dan vrat udyapan | hen nenen mi sadhan kay karun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
यज्ञ याग दान व्रत उद्यापन । हें नेणें मी साधन काय करूं ॥१॥ जप तप होम स्वधर्माचरण । नव्हे तीर्थाटण कांहीं मज ॥२॥ गया पिंडदान प्रयागींचें स्नान । कर्म अनुष्ठान नव्हे मज ॥३॥ भक्ति उपासना देवाचें पूजन । ध्यान उपोषण नव्हे मज ॥४॥ पृथ्वीचें भ्रमण अनुताप संपूर्ण । सारासार खूण नकळे कांहीं ॥५॥ पुण्य नाहीं गांठीं पापाचें संचित । परम पतित वाटे मज ॥६॥ माझा देह आहे पातकांचा थारा । मी अपराधी खरा कळलेसें ॥७॥ पुराणप्रसिद्ध नाम तुझें सार । ऐसें निरंतर बोलताती ॥८॥ अन्याथा वचन नोहे हें प्रमाण । तरी ब्रीदें जाण सांडवलीं ॥९॥ तुम्ही व्रीद आपुलें जतन करणें । तरी नारायणें सांभाळावें ॥१०॥ नामेंविण कांहीं आम्हांपाशीं नाहीं । विचारोनी पाही पांडुरंगा ॥११॥ धन वित सर्व आमची हे जोडी । नामा म्हणे गोडी नामीं तुझें ॥१२॥