भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदध्वनि केलिया मुनी । गंधर्वगायनें होती गगनीं

vedadhvani keliya muni | gandharvagayanen hoti gaganin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेदध्वनि केलिया मुनी । गंधर्वगायनें होती गगनीं । ब्रह्मादिक इंद्र विमानीं । इंद्रायणी ज्ञानदेवी ॥१॥ लागलिया मंगळतुरे ध्वनि । तीर्थे उभी असती कर जोडुनी । विठठलदेव ज्ञान संजीवनीं । नयनीं न्याहाळिती ॥२॥ राही रखुमाई माता । सत्यभामा गोपी समस्ता । आरतिया ओवाळिती निभ्रांता । ब्रह्म त्वरिता ज्ञानदेवा ॥३॥ देवऋषिगण सकळ । जयजयकार ध्वनि मंजुळ । स्तुतिस्तोत्रें सकळ । नक्षत्रादिक गाती ॥४॥ वरुषति दिव्यसुमनेम । निवृत्तिसोपान नारायणें । संमोखिलें संजीवनें । नित्य पारणें हरिपाठें ॥५॥ परिसा भागवत डुलत । विठठलीं जाला कृतकृत्य । नामा असे शोकाकुलित । चरणीं रत विठ्ठलाचे ॥६॥ शेज घालुनी सुमनीं । विठठल पाहे रुक्मिणी । ज्ञानदेवाचे गुण मनीं । आठवती म्हणे हरी ॥७॥ नामा जाला भयभीत चित्तें । ज्ञानासारखें रत्न मागुते । न देखों ऐसें विठ्ठलातें । पुसे त्वरित रुक्मिणी ॥८॥