भजनी मालिका
← भजनांकडे परत

उघडोनी नेत्र पाहे जंव पुढें

ughadoni netra pahe janv pudhen

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
उघडोनी नेत्र पाहे जंव पुढें । तंव दृष्टी पडे पांडुरंग ॥ १ ॥ देखिली पंढरी ध्याना तेची । येत जयराम दिसत दृष्टीपुढें ॥ २ ॥ ब्राह्मण स्वप्नांत देखिला तो जाण । त्याची आठवण मनीं वाहे ॥ ३ ॥ न दिसे आणिक नेत्रांपुढें जाण । नामाचें स्मरण मनीं राहे ॥ ४ ॥ पूर्वील हरिकथा आयकिल्या होत्या । त्या मनीं मागुत्या आठवती ॥ ५ ॥ तुकोबाची पदें अद्वैत प्रसिद्ध । त्यांचा अनुवाद चित्त झुरवी ॥ ६ ॥ ऐसीं ज्याचीं पदें तो मज भेटतां । जीवास या होतां तोष बहु ॥ ७ ॥ तुकोबाचा छंद लागला मनासी । ऐकतां पदांसी कथेमाजीं ॥ ८ ॥ तुकोबाची भेटी होईल ते क्षण । वैकुंठासमान होये मज ॥ ९ ॥ तुकोबाची ऐकेन कानीं हरिकथा । होय तैसें चित्ता समाधान ॥ १० ॥ तुकोबाचें ध्यान करोनी अंतरीं । राहे त्याभीतरीं देहामाजीं ॥ ११ ॥ बहिणी म्हणे तुका सद्‌गुरु सहोदर । भेटतां अपार सुख होय ॥ १२ ॥