भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपाजी गोसावी पुण्यांत रहात

apaji gosavi punyant rahat

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
आपाजी गोसावी पुण्यांत रहात । जो अति विख्यात राजयोगी ॥ १ ॥ तयाप्रती पत्र मंबाजी पाठवी । तुकोबा गोसावी शूद्रवाणी ॥ २ ॥ कथा करितसे देऊळीं सर्वदा । द्विज त्याच्या पदा लागताती ॥ ३ ॥ रामेश्वर भट अति योगी थोर । तेही नमस्कार त्यांसी करिती ॥ ४ ॥ आम्हांसी अन्याय हाची थोर वाटे । होत असें खोटें वेदवाक्य ॥ ५ ॥ तुम्ही थोर आहां दंड करावया । बांधोनीया तया न्यावें तेथें ॥ ६ ॥ आणीक ही एक स्त्री-पुरुष आहेती । तेही म्हणविती शिष्य त्याचे ॥ ७ ॥ म्हणविती ब्राह्मण आहेती सोनार । कुळकर्णी ही फार मान्य केले ॥ ८ ॥ स्वधर्माचा लोप होतसे देखोन । धाडिलें लिहोन म्हणोनिया ॥ ९ ॥ याचा कीं अपमान न करितां जाण । राज्यही बुडोन जाय तरी ॥ १० ॥ डोंबाळें मांडून स्वधर्म लोपला । पाहिजे रक्षिला स्वामीराजें ॥ ११ ॥ बहिणी म्हणे ऐसें पत्र पाठविलें । चोरोनी लिहिलें घरामाजीं ।