भजनी मालिका
← भजनांकडे परत

आरोग्य तात्काळ व्यथेचा हारास

arogya tatkal vyathecha haras

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
आरोग्य तात्काळ व्यथेचा हारास । झाला दिसंदीस भ्रताराचा ॥ १ ॥ मग करी कृपा बोले समाधानें । द्वेषाचें हें ठाणें दूर केलें ॥ २ ॥ म्हणे आतां सर्व जावें येथुनियां । आपुलीया ठाया स्वस्थानां ॥ ३ ॥ देवें आपणासी ब्राह्मणाच्या वेषें । सांगितला शेष प्राक्तनाचा ॥ ४ ॥ तेंचि आतां करूं हरीची वो भक्ती । मिरासींची खंती वाटियेली ॥ ५ ॥ माझीं मायबापें तयांसी सांगत । तुम्ही जा निवांत देवगांवा ॥ ६ ॥ आपण अरण्यात दोघे करूं वास । देवाच्या बोलास धरोनीया ॥ ७ ॥ होवो आतां कल्याण किंवा अकल्याण । आम्ही तों संपूर्ण भक्ती करूं ॥ ८ ॥ तुकोबाचे गांवा जाऊनीया राहों । मनींच दृढावो धरोनीया ॥ ९ ॥ ऐसी पालटली भ्रताराची बुद्धि । स्वामी कृपानिधी अंतरसाक्ष ॥ १० ॥ काय एक देव करील तें नव्हे । प्रत्यक्ष अनुभवें सर्वजनां ॥ ११ ॥ बहिणी म्हणे अवघी चालिलों । तुकोबाच्या आलों दर्शनासी ॥ १२ ॥