भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदारांचा राणा म्हणविसी आपणां । सांग त्वां कवणां काय दिल्हें

udarancha rana mhanavisi apanan | sang tvan kavanan kay dilhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उदारांचा राणा म्हणविसी आपणां । सांग त्वां कवणां काय दिल्हें ॥१॥ उचिता उचित भजसी पंढरीनाथा । न बोलों सर्वथा वर्में तुझीं ॥२॥ वर्में तुझीं कांहीं बोलेन मी आतां । क्षमा पंढरीनाथा करी बापा ॥३॥ न घेतां न देसी आपुलेंहि कोण । प्रौढी नारायणा न बोलावी ॥४॥ बाळमित्र सुदामा विपत्तीं पिडला । तो भेटावया आला तुजलागीं ॥५॥ त्याचें मुष्टिपोहेसाठीं मन केलें आसट । मग दिलें उत्कृष्ट भाग्य तया ॥६॥ छळावया पांडव दुर्वास पातला । द्रौपदीनें केला धांवा तुझा ॥७॥ गेली वृंदावना केली प्रदक्षेना । आळविला कान्हा द्वारकेचा ॥८॥ आळवी पांचाळी येर बा वनमाळी । राख ये काळीं सत्व माझें ॥९॥ येवढिया आकांतीं घेऊनि भाजीपान । मग दिलें अन्न ऋषिलागीं ॥१०॥ बिभीषना दिधलि सुवर्णाची नगरी । हे कीर्ति तुझी हरि वाखाणिती ॥११॥ वैरियाचें घर भेदें त्वां घेतलें । त्याचें त्यासी दिधलें नवल काया ॥१२॥ धरुवा आणि प्रल्हाद अंबऋषि नारद । हरिश्चंद्र रुक्मांगद आदि करुनी ॥१३॥ त्याचें सेवाऋण घेऊनि अपार । मग त्या देशी वर अनिर्वाच्या ॥१४॥ एकाचि शरीरसंपत्ति आणि वित्त । एकाचें तें चित्त हिरोनि घेसी ॥१५॥ मग तया देशी आपुलें तूं पद । जगदानी हें ब्रीद मिरविसी ॥१६॥ माझें सर्वस्व घेई तुझें नको कांहीं । मनोरथाची नाहीं चाड मज ॥१७॥ नामा म्हणे केशवा जन्मजन्मांतरीं । ऋणी करिन हरी ऋणें सेवा ॥१८॥