भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभुवनाची परी मांडिली शरीरीं । गोकुळाभीतरीं उभारिलें

tribhuvanachi pari mandili sharirin | gokulabhitarin ubharilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
त्रिभुवनाची परी मांडिली शरीरीं । गोकुळाभीतरीं उभारिलें ॥१॥ शेषाचीये द्दष्टी मूळ भूमिका चोखटी । तेथुनी मूळ सृष्टी आरंभिली ॥२॥ मन विंदानीं आणि कुंडलणी चतुर्दळांपासुनी । पवनवेगीं टाकुनी पति समया स्वाधिष्टानी ॥३॥ मणीपूर पर्यंत तळवट शोभिवंत । तेथुनी टाकितसे नीट कर्मभूमीं ॥४॥ बारा सोळा नारी श्रीपति मुरारी । ह्रदय मंदिरीं गोपीराजु ॥५॥ कनक घाटेवरी सत्नावी सुंदरी । चाले उन्मत्त भारी चंद्रकळा ॥६॥ तेथें रोवियला दारवंटा दावी त्याच्या वाटा । जावया वैकुंठा गौळियांसी ॥७॥ मृत्यूलोकींचिया सैंवरा आल्या ज्या चौबारा । देखिल्या त्या घरां चौघीजणी ॥८॥ त्या चिपोळीया वाहती मिळोनियां येती । चालती मागुती पश्चिमपंथीं ॥९॥ अनुहतावरी वाट करुनी नीट । विशुद्ध नगरा येती धीट ॥१०॥ तेथुनी वाटा असे नीट दारवंटा । तेथूनि जावें ब्रम्हरंध्र कपाटां ॥११॥ हेंचि परब्रम्हराऊळ तेथुनी । जाऊं नये उढारीं सांडुनी राया ॥१२॥ तेथें रविशशीवरी आणि ब्रम्हरश्मी स्वरूप । एकांत ओवरी आहे अमूप ॥१३॥ विष्णुदास नामा सांगे निर्वाणींच्या खुणा । अनुभवी तोचि जाणें येरा चोजवणा ॥१४॥