भजनी मालिका
← भजनांकडे परत

तप थोर देखिलें संसारीं । जो अखंड कीर्तन करी । त्याच्या तपा पुढारिले हरि । हें निर्धारें जाणा हो

tap thor dekhilen sansarin | jo akhand kirtan kari | tyachya tapa pudharile hari | hen nirdharen jana ho

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तप थोर देखिलें संसारीं । जो अखंड कीर्तन करी । त्याच्या तपा पुढारिले हरि । हें निर्धारें जाणा हो ॥१॥ धन्य धन्य विष्णुदास । ऐसा हरिनामीं सौरस । ते पितरांसहित वैकुंठ । सर्वकाळ क्रमिती ॥२॥ जप तप ज्ञान विठ्ठल । तयासी नाहीं काळवेळ । टाळी वाजवितांचि निर्मळ । महादोष हरतील ॥३॥ जेथें रामकृष्ण उच्चार । सकळ मंत्रांत मंत्रसार । पांचांही वदनीं शंकर । नित्य रामनाम जपतसे ॥४॥ तो हा पुंडलीकें उभा केला । आपण दृष्टिसमोर बैसला । कीर्तनें त्रैलोक्य तारिला । स्नानदानें पितरांसहित ॥५॥ न लगे करावे यज्ञ-भाग । न लगो आणिक मंत्रलाग । एक सेविलिया पांडुरंग । अनंत तीर्थें घडतील ॥६॥ पंचक्रोशी प्रदक्षिणा । नित्य नमस्कारीं विठ्ठल चरणां । तरी घडेल पृथ्वीप्रदक्षिण । कोटिच्या कोटी अनंत ॥७॥ सप्तपुरीं द्वादश लिंगे । कीर्तनें डोलती लागवेगें । ऐसे भक्त तारिले पांडुरंगें । विटेवरी उभा नीट राहोनी ॥८॥ नामा सांगे गुह्य गोष्टी । विठ्ठल तारक एक सृष्टी । पंढरी देखिलिया दृष्टी । वैकुंठपद पाविजे ॥९॥