भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव पुंडलिक पुढारला । कर जोडोनि वदला

tanv pundalik pudharala | kar jodoni vadala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव पुंडलिक पुढारला । कर जोडोनि वदला । म्हणे वेदादिकां अबोला । तुझिया रुपाचा ॥१॥ तो तूं प्रकट श्रीरंगा । भीमातटीं पांडुरंगा । येउनि आमुचिया लोभा । भक्तजनां तारिसी ॥२॥ नेणों कोण भक्तपण । नेणों तुमचें महिमान । कोण तप कोण साधन । कोणें जन्मीं केलें होतें ॥३॥ नीरे भिवरेचां संगमीं । चंद्रभागेचां उगमीं । वेणुनाद परब्रह्मीं । गोपाळ गजरें गर्जती ॥४॥ तरी स्वामी दयाळा । महाविष्णू गोपाळा । भक्तालागीं कृपाळा । तारावया दासासी ॥५॥ माझें करुनियां मिस । राहिलास युगीं अठठावीस । धरुनि सगुण गुणास । माझे भक्ति लोधलासी ॥६॥ तूं नियंता ईश्वरमूर्ति । सकळ गोसावी श्रीपती । तुजवांचोनी नेणें मती । दयामूर्ति परब्रह्मा ॥७॥ नामा म्हणे पुंडलिका । देवें म्हणती पुण्यश्लोका । स्तुति आदर केला निका । धैर्य विवेक तूंचि होसी ॥८॥