भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव निवृत्तीसी उन्मनीं । बैसका होती सप्तदिनीं

tanv nivruttisi unmanin | baisaka hoti saptadinin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव निवृत्तीसी उन्मनीं । बैसका होती सप्तदिनीं । ते पालटोनि तत्क्षणीं । मूर्तीतं न्याहाळी ॥१॥ निवृत्तिनिधान । सोपान निजधन । ज्ञानदेव आपण । तिन्ही मूर्ती ॥२॥ कोण भाग्याचे संतुष्ट । जेथें प्रगटलें वैकुंठ । विठठलनामें पूर्ण पाठ । आळंकापुरीसी ॥३॥ आदि क्षेत्र जुनाट । युगें सांगतां उद्‌भट । जें कां पुण्यरुप प्रगट । सांगतसे महिमा ॥४॥ ऐसा उत्साह गमला । निवृत्ति ध्यानीं निवाला । सोपान आळंगिला । ज्ञानराजें ॥५॥ निवृत्ति पाहे ज्ञानाकडे । येरु धांवे लवडसवडें । तंव चरणरजामाजीं बुडे । मन निमग्न केलें ॥६॥ तिन्ही देव एकत्र । सत्वरजमादि मंत्र । हे गाताती नरे जे स्तोत्र । ते उद्धरती सर्वथा ॥७॥ नामा म्हणे तिन्ही देव । मिळाले गुण सागर वैभव । समाधि सेज माधव । देतु असे ज्ञानदेवा ॥८॥