भजनी मालिका
← भजनांकडे परत

सूर्यवंशीं राजा असे तो श्रीयाळ । पंच वरुषीं बाळ चिलया त्यासी

suryavanshin raja ase to shriyal | panch varushin bal chilaya tyasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सूर्यवंशीं राजा असे तो श्रीयाळ । पंच वरुषीं बाळ चिलया त्यासी ॥१॥ पतिव्रता कांता नाम तें चांगुणा । अतिता भोजन घाली नित्य ॥२॥ कैलासीं नारद वर्णी यांची कीर्ति । सत्व पाह्याप्रति आले शिव ॥३॥ जाहालासे अतित रूप तें कुश्चळ । रक्त पू हा गळे सर्वांगासा ॥४॥ आला तो अतित श्रीयाळाचे घरीं । नमस्कार करी राजा त्यासी ॥५॥ येऊनि चांगुणा वंदिती चरण । बहुत सन्मान केला त्याचा ॥६॥ उष्णोदकें त्यासी घातियलें स्नान । केलेंसे पूजन अतिताचें ॥७॥ म्हणे महाराजा करावें भोजन । पतीता पवन करा तुम्ही ॥८॥ येरु म्हणे माझें शरीर हें रोगी । नरमांस वेगीं देईं मज ॥९॥ चांगुणा ती म्हणे देतें माझें मांस । नये उपयोगास आमूचिया ॥१०॥ राज म्हणे माझें मांस मान्य करा । न लगे उदारा तुझें मज ॥११॥ पंच वरुषीं बाळ तुझा हा चिल्हाळ । मांस हें सकळ देईं त्याचें ॥१२॥ पाक हा करुनी घालीं मज आतां । खेद काय चिंता करूं नये ॥१३॥ करितां हा खेद जाईन उठोनी । सत्वाची हे हानी करूनियां ॥१४॥ तेव्हां ते चांगुणा म्हणे अतितातें । करितें पाकातें सिद्ध आतां ॥१५॥ बोलविला तेव्हां तिनें तो चिल्हाळ । वचन कोमळ बोले त्यासी ॥१६॥ तुज हा अतित आलासे पाहुन । मागतो भोजन तुजलागीं ॥१७॥ होईं बा उदार अर्पी हें शरीर । संतोषला वर पार्वतीचा ॥१८॥ ऐकोनी चिलया बोले मातेप्रती । संतोष हा चित्तीं माझे असे ॥१९॥ नाशवंत देह नाहीं राहणार । सार्थक समग्र करीं याचें ॥२०॥ सांडीं हे ममता होईं तूं उदार । कैलासी शंकर संतोषेल ॥२१॥ घेऊनि चिलिया गेली पाकशाळे । कापियेलें बाळ चांगुणेनें ॥२२॥ शीर त्याचें तेव्हां ठेविलें झांकोन । शरिराचा तिनें पाक केला ॥२३॥ तेव्हां तो अतित बोले चांगुणेसी । वस्तु हे कार्याची ठेवियेली ॥२४॥ मीही आतां जातों आपुल्या आश्रमा । कासयासी श्रम करितेसी ॥२५॥ तुज हे ममता झालीसे उत्पन्न । वाहतसे आण चांगुणा ते ॥२६॥ म्हणे महाराजा सांगाल तें मान्य । वंदित चरण चांगुणा ते ॥२७॥ पाकामाजी घालीं शीर हें कांडोनी । रसिक गाय गाणीं आवडीनें ॥२८॥ चांगुणेनें शीर घातिलें उखळीं । ओंव्या ते वेल्हाळी गात असे ॥२९॥ सत्वधीर राजा स्वामी हा श्रीयाळ । धन्य त्याचा बाळ चिलया तूं ॥३०॥ अतिताच्या वेशें आला असे शिव । देखोनियां भाव द्दढ तुझा ॥३१॥ आवडीनें तुज ठेवितो उदरीं । पुण्याची सामोग्री मोठी तुझी ॥३२॥ माझे पोटीं तुवां घेतला अवतार । दाविलें चरित्र जगामाजी ॥३३॥ येऊनि वंशाचा केला त्वां उद्धार । मित्र केला वर पार्वतीचा ॥३४॥ तुझी माता मज म्हणती हे जन । पूर्वींचें हें पुण्य फळा आलें ॥३५॥ तुज हा प्रसन्न जाहला सदाशिव । मागसी वैभव देईल तो ॥३६॥ मज बाळा तुवां सांडियेलें येथें । कैलासींचा पंथ धरीयेला ॥३७॥ अतित गेलीया सांडीन मी प्राण । येईन धांवोन तुजमागें ॥३८॥ तुझी माजी भेटी होईल कैलासीं । सांग शिवापाशीं नमस्कार ॥३९॥ धैर्याचा उखळ वैराग्य मुसळ । घेतलें सबळ चांगुणेनें ॥४०॥ कांडून्यां शीर केला पाक तिनें । अतिताकारणें भोजनासी ॥४१॥ म्हणे महाराजा करावें भोजन । वंदित चरण चांगुणा ते ॥४२॥ येरु म्हणे बाई पात्रें वाढी तीन । पंक्ति यजमान बैसा तुम्हीं ॥४३॥ ऐकोनी श्रीयाळ सद्नद अंतरीं । जाला असे भारी मोठा तेव्हां ॥४४॥ तेव्हां ते चांगुणा म्हणे श्रीयाळासी । बैसावें पंक्तीसी स्वामी आतां ॥४५॥ नवमास बाळ ठेविला उदरीं । एक दिन भारी काय झाला ॥४६॥ अतिता संतोष होय ऐसें करा । मान्य गिरिजावर होईल तो ॥४७॥ सिद्ध झालीं तेव्हां दोघें भोजनासी । अतित तयासी पुसतसे ॥४८॥ काय तुम्हां आतां असे हो संतान । केलें शिवार्पण म्हणती ते ॥४९॥ निपुत्रिकाचे घरीं न घे मी हें अन्न । चालिला उठोन अतित हा ॥५०॥ श्रीयाळ चांगुणा वंदिती चरण । फुटकें प्राक्तन आमुचेंचि ॥५१॥ चिलयासारिखा गेला तोही सुत । विन्मुख अतित जातो तोही ॥५२॥ आतां कासयासी ठेवावा हा प्राण । करावा अर्पण शंकरासी ॥५३॥ एकोनियां ऐसें अतित तो भ्याला । चांगुणे पुत्राला बाहे आतां ॥५४॥ येईंबा चिलया धांव तूं त्वरीत । न जेवी अतित तुजवीण ॥५५॥ राखीं आतां सत्त्व येईं तूं धांवोनी । तेव्हां शूळपाणि प्रगटले ॥५६॥ पंचमुख अंगीं विभूत चर्चित । अर्धांगीं शोभत पार्वती ते ॥५७॥ मुगुटीं जयाचे शोभतसे गंगा । कोण वर्णी शोभा स्वरूपासी ॥५८॥ धांवतचि आला तेव्हां तो चिल्हाळा । आलिंगी स्नेहाळ सांभ त्यासी ॥५९॥ श्रीयाळ चांगुणा बैसवी विमानीं । बाळ राजस्थानीं स्थापियेला ॥६०॥ अखंड कैलासीं असे त्यांचा वास । धन्य तेचि दास सांभवाचे ॥६१॥ नामदेव त्याचे आठवीत गुण । करीत करीत कीर्तन प्रेमभावें ॥६२॥