भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्पष्ट जोडोनियां कर । मी दासानुदास अपार

spashta jodoniyan kar | mi dasanudas apar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्पष्ट जोडोनियां कर । मी दासानुदास अपार । प्रार्थना करुनि नमस्कार । उतरी पार भवाब्धि ॥१॥ निवृत्ति मुक्ताई परियेसी । योगीराज जाला उदयासी । वद्य कार्तिक मासीं । आळंकापुरीं जावें लागे ॥२॥ ज्ञानदेवें मागितला मान । देव वैष्णवांचें आगमन । येऊनि गंधर्वाचें विमान । विधि नारायण संपादिला ॥३॥ इंद्रनीळ पर्वत पुरातन । पूर्वी येथें ब्रह्मयाचें स्थान । कौंडण्यपुरीं अंबिकाभुवन । महाब्रह्म योग माया ॥४॥ तिची भावें केली पूजा । परमार्थ साधिला स्वहित काजा । मुक्ताई आणि निवृत्तिराजा । सोपान सहजा सिद्ध जाले ॥५॥