भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार शेत सुलभ थोर भूमी वाहिलीं नवही द्वारें । पांचही आउतें मेळवुनी तेथें जुंपियेली दोन्ही ढोरें

sansar shet sulabh thor bhumi vahilin navahi dvaren | panchahi auten melavuni tethen jumpiyeli donhi dhoren

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसार शेत सुलभ थोर भूमी वाहिलीं नवही द्वारें । पांचही आउतें मेळवुनी तेथें जुंपियेली दोन्ही ढोरें । उखीतें करी येति जाती भारि नव्हती कोण्हि स्थिरें । बुनादि शेत वाहिलें तें काय सांगूं अपाररे ॥१॥ संसार शेत करि कांरे आल्या देहाचिया लाहे परि । भक्ति उंच माळा उभा राहुनि हरिनाम सोंकरिरे ॥२॥ हरिश्चंद्र राजा सात्विक भला तेणें बाहो केला । सत्त्व नांगर त्रिगुण तिफणि निर्वाण कुळव धरिला । भक्ति कुर्‍हीवरी उभा राहूनियां बहुत भाग्य पिकला । खळेदाणे तेणें दिधले ब्राम्हण युगायुगीं तरलारे ॥३॥ शिराळ शेटी कुळवाडी मोठा बहु सोसियेल्या वेठी । आलिया गेलिया जेववी राड भक्ता देतो थोर सृष्टी । भला म्हणोनि जगीं वाखाणिला देव आला त्याचे भेटी । मुक्ति शेत तया इनाम दिधला ठाव दिला वैकुंठीं ॥४॥ रावणाचें शेत चवदा चाहुर दाटल्या दुर्बुद्धी पेढी । गर्व अहंकार दाट खुंट झाडें शेत आलें तेणें पडी । किडा मुळिंजो बैसला बीज गेलें तेणें वोढी । बटकर बाण अंगीं जो सेकला तोही झाला देशधडीरे ॥५॥ अवघी कुळवाडी कौरवें केली नाटोपेचि दुर्योधन । अर्ध वांटेकरी धर्म दुराविला शेतासि नाहीं रक्षण । अधर्म टोळीं शेत जें खादलें बिज गेलें चौपट होऊन । हरिभक्तिविण फलकट जालें न जोडे कृष्ण निधानरे ॥६॥ पांचही पांडवीं नवाट काढिलें वाहिलें सद्वैत वन । निरंजन वन शेत जें पिकलें आपण कृष्ण रक्षण । द्रौपदी सुंदरी डाहोरा जो केला दुर्वासा दिधलें भोजन । अनंत खंडी सांजे जे पिकली जोडलें कृष्ण निधानरे ॥७॥ ज्ञानदेव चांगदेव वटेश्वर निवृत्ति मुक्ताई सोपानदास । परसाभागवत सांवता सालया रसाळ चोखा मुधेश । परमानंद जोगाजनमित्र नागा गोरा दागा कूर्मदास । इतुके शेतकरी त्यांचा अंगेवाटे करी नामा विष्णुदासरे ॥८॥