भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार परजनीं । दूर दिधलें मज साजणी । द्वारकापुर पाटणीं । माझें माहियेर

sansar parajanin | dur didhalen maj sajani | dvarakapur patanin | majhen mahiyer

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसार परजनीं । दूर दिधलें मज साजणी । द्वारकापुर पाटणीं । माझें माहियेर ॥१॥ थोर उत्कंठा मनीं । वाट पाहें प्रतिदिनीं । मज नेत कां न कोणी । तया माहियेरा ॥२॥ चित्तीं न लगती व्यापार । मनीं होंचे वारंवार । आड ठाकले गिरी डोंगर । तया माहियेरा ॥३॥ माझिये सासुये निष्ठुरें । दुरळ बोलिलीं उत्तरें । तंव तंव मी तूतें स्मरें । विठू बापु माहियेर ॥४॥ येथें कोणी नाहीं माझें एक । जें त्यासि बोलूं सुख दु:ख । हें मन उतावेळ देख । तया माहियेरासाठीं ॥५॥ कामक्रोध भावे दीर । बोलती अति निष्ठुर । तेवेळीं त्यजिजे संसार । ऐसें वाटतसे मना ॥६॥ या वो संसारीं नसिजे । संगु अवघाची सांडिजे । नि:संग होऊनि राहिजे । तया माहियेरा ॥७॥ या वो प्राणाचे संकटीं । आत्मा ठेवूनियां कंठीं । मग चालवीं घरराहटी । म्हणिजे काम रात्रंदिवस ॥८॥ याचे कूर बोल न होती । तेणें मी असें निर्बुज चित्तीं । निरोप धाडूं कवणा हातीं । तया माहियेरा ॥९॥ तंवचि वो शिणिजे । जंव यातें न वोळंगीजे । याचें बीज पाविजे । नामें एकें विठ्ठलें ॥१०॥ आतां बहु काय बोलिये । यासि सुवेळा न पुसिजे । पुण्यमार्में जाईजे । तया माहियेरा ॥११॥ माझी सखी जे कां भक्ति । मज तेचि संबोखितो । तिये लाविले शुद्धमती । साह्य ते मज चुकों नेदी ॥१२॥ सत्य भावो मज सांगाती । येर लटकिया व्युत्पत्ति । मी वो जाईन हरखें जतीं । तया माहियेरा ॥१३॥ कृष्ण माउली भेटेल । शीण अवघाचि हरेल । सुख आनंदुन मायेल । या या त्रिभुवनीं ॥१४॥ या बहु जन्माचा शीण वो जाईल । विठोदर्शनें दु:ख हरेल । नामा सुखिया होईल । केशव चरणीं ॥१५॥