भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वजन्मीं आराधितां । तुझें वर्म आलें आमुच्या हातां । नामदेवें सांगितलें जातां । तें सर्वथा देईंजे

purvajanmin aradhitan | tujhen varma alen amuchya hatan | namadeven sangitalen jatan | ten sarvatha deinje

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पूर्वजन्मीं आराधितां । तुझें वर्म आलें आमुच्या हातां । नामदेवें सांगितलें जातां । तें सर्वथा देईंजे ॥१॥ आमुचे वडिलीं गा जोडिले । तें तुझे पायीं गा ठेविलें । गौप्य करितो नोव्हे गा भलें । दे उगलें गा दातारा ॥२॥ आमुचें आम्हांसी गा देतां । कां बा नये तुझ्या चित्ता । गार्‍हाणें देईन संता । चौघां देखतां घेईन ॥३॥ तुझा दारवंटा राखेन हरी । तुज रीघों नेदीं बाहेरी । जरीमोकलिसी अधांतरीं । तरी हे लाज कवणातें ॥४॥ आणिक कांहीं न मागें तूंतें । सेवावृत्ति द्यावी मातें । मज निरवावें संतांतें । आपुला दास म्हणोन ॥५॥ नामयाचा विठा म्हणे । यांत कांहीं करिसी उणें । तरी आमुच्या वडिलाचें निरूपणें । बांधलासी गा विठ्ठला ॥६॥