भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रात:काळीं राधा उठोनियां जाण । नंदसदनावरून पाण्या जात

prat:kalin radha uthoniyan jan | nandasadanavarun panya jat

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रात:काळीं राधा उठोनियां जाण । नंदसदनावरून पाण्या जात ॥१॥ इकडे गोदोहन करीतसे हरी । पाहे उभी द्वारी राधिका ते ॥२॥ विसरे गोदोहन वृषभाखालीं बैसत । कृष्णजीचें चित्त वेधियेलें ॥३॥ भरणा रिचवोनी बाहेर आली माता । वृषभ दोहतां हरि देखे ॥४॥ माता ह्मणे काय करीसी घननीळा । प्रत्युत्तर त्यावेळां हरि देत ॥५॥ दाराकडे पाहे राधेसी न्याहाळून । मातेसी वचन बोलतसे ॥६॥ भरणा भरला आतां जांई तूं घेऊन । माता क्रोधायमान झाली तेव्हां ॥७॥ कृष्णासी यशोदा ह्मणे खालीं पाहे । वृषभ कीं गाय दोहतसे ॥८॥ कृष्ण खालीं पाहे वृषभ देखिला । ह्मणे यशोदेला ऐक एक ॥९॥ देवाचा नवस चुकली बहुतेक । चौ थानांचें थान एक झालें ॥१०॥ वचन ऐकोनी हांसत यशोदा । द्वारीं उभी राधा देखियेली ॥११॥ कांगे येथें उभी घेऊनि घागर । जातसे सत्वर राधा तेव्हां ॥१२॥ नामा म्हणे ऐसें झालें । मुख प्रक्षाळून हरि जेविले ॥१३॥