भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रथम अवतारीं आई थोर ख्याति केलीवो । ब्रम्हयाच्या कैवारा आपण मत्स्यरूप झाली वो

pratham avatarin ai thor khyati kelivo | bramhayachya kaivara apan matsyarup jhali vo

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रथम अवतारीं आई थोर ख्याति केलीवो । ब्रम्हयाच्या कैवारा आपण मत्स्यरूप झाली वो । धुंडाळिला सागर आई शंखासुरा मिठी घाली वो । वधियले राक्षस ब्रम्हपुरीं त्वां स्थापिलें वो ॥१॥ ऐसी बहु लोकां माझारी आई खेळतसे गोंधळींवो । तेहतीस कोटि देवता सवें मेळवुनी मेळींवो । त्रासिले राक्षस भक्त जना प्रतिपाळींवो ॥२॥ कूर्म वेश धरुनी धरणी पाठीवरी धरिली वो । महेंद्र मंथन मेळीं आंबा वेगीसी पावली वो। समुद्रमंथन करितां आई बरवा गोंधळ घाली वो । नारायण विश्वरुप देवा जैं त्वांच दिधलें वो ॥३॥ वराह रूप धरुनी आई थोर पवाडा केला वो । पृथ्वीच्या कैवारा घालिसी गोंधळ गाढा वो । वधिला हिरण्याक्ष त्याचा केला त्वां रगडावो । खेचर देवता धरणी धरियली दाढा वो ॥४॥ विक्राळ रूप धरुनी स्तंभ फोडुनी निघाली वो । सिंहनादें गर्जतां हाक त्रिभुवनीं गाजली वो । वधिला हिरण्यकश्यप अंतरमाळा गळां घाली वो । प्रर्‍हादाकारणें कैसी गोंधळीं नाचली वो ॥५॥ इंद्राच्या कैवारा आई सानें रूप धरिलें वो । बळिच्या द्वारा जाऊन भूमिदान मागितलें वो । त्रिलोक मोजिततं बळिस पाताळीं घातलें वो । मागुता येईल म्हणवुनी त्याचें द्वार त्वां रक्षिलें वो ॥६॥ जमदग्नि रेणुके कुशीं धरियेला अवतार वो । हातीं परशु घेउनी केला दैत्यांचा संहार वो । एकविस वेळ मेदिनी नि:क्षत्रिय करुनी फेडिला भूमिभार वो । वधिला सहस्रार्जुन कामधेनूच्या कैवारा वो ॥७॥ पितृवचनाकारणें आई वनवासासी गेली वो । अठरापद्में वान्नर मेळवुनी गोंधळ घाली वो । वधिला दशशिर लंका शरणागता दिधली वो । कौसल्या माउलि देवा बंदी सोडी केली वो ॥८॥ वसुदेवकुळटिळके तरी तूं कंसासुर मारिके वो । कुळांतकुळ तारिके तरी तूं कौरव संहारिके वो । पांडव प्रतिपाळके भक्तजनाशी तारके वो । तुझा गोंधळ गाता अंबे कोण वर्णूं शके वो ॥९॥ वेदमार्ग सांडुनि असुरें देवा गांजियलें वो । त्याचिया कैवारा आई त्वां सौम्यरूप धरिलें वो । बौद्धरूप धरुनी भक्तालागीं मोहिलें वो । कौसल्या देवता जे त्या रूपें त्वां दिधलें वो ॥१०॥ कलियुगाच्या अंतीं थोर होईल अन्नान्न वो । एके ठायीं होउनी खातील चारी वर्ण वो । तेव्हां पृथ्वी भारें तुजला येईल शरण वो । तेव्हां तूं पावसी कलंकी अवतार धरुनी वो ॥११॥ पुंडलिकाकारणें पंढरपुरीं केला वास वो । तुझा गोंधळ गातां थोर जिवा उल्हास वो । तूं माये माउली तुझा मज बहु विश्वास वो । विनई विष्णुदास नामा तुझा दासाचा मी दास वो ॥१२॥