भजनी मालिका
← भजनांकडे परत

पश्चिमे प्रभास आदि करोनी द्वारका । पाहिल्या सकळिका मोक्षपुर्‍या

pashchime prabhas adi karoni dvaraka | pahilya sakalika mokshapur‍ya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पश्चिमे प्रभास आदि करोनी द्वारका । पाहिल्या सकळिका मोक्षपुर्‍या ॥१॥ पंथीं पावन तीर्थें करुनि सकळिकें । प्रक्षाळलीं पातकें वासनेचीं ॥२॥ परी पंढरीचें प्रेम नामयाचे जीवीं । माउलीं आठवी पांडुरंग ॥३॥ जीवन्मुक्त दोन्हीं भक्त आणि ज्ञानी । परतोनि तेथोनि येते मार्गीं ॥४॥ तृषाकांत वनीं होतसे पीडनी । पडलें चिंतवणीं जीवनालागीं ॥५॥ तंव दृष्टि एक कूप देखिला अवचिता । उदक तेथें पाहतां न लगे अतु ॥६॥ कवणेपरी येथें करुं रिघवणी । प्राण संतर्पणी वांचवावे ॥७॥ मग त्या नाम्याप्रती बोले ज्ञानदेवो । मज एक उपावो साध्य असे ॥८॥ लघिमेचे लाघव करुनि ते अवसरीं । उतरोनि भीतरीं घेतलें उदक ॥९॥ घेऊनि उदक निघाला बाहेरी । मग म्हणे अवधारी नामदेवा ॥१०॥ आणोनि उदक देईन तुझ्या हातीं । न दिसे अनुगति आणिक कांहीं ॥११॥ पडिल्या संकटीं विचारावें मनीं । सांडावी आयनी अभिमानाची ॥१२॥ आत्मा तो विठठल सर्व निरंतरीं । आज्ञा दे झडकरि वेळु जाला ॥१३॥ आत्मा तो विठ्ठलु असताम सर्व देहीं । माझी काय नाहीं चिंता त्यासी ॥१४॥ नामा म्हणे धीर करावा नावेक । दावीन कवतुक स्वामीजवळी ॥१५॥