भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाषाणाचा देव बोलेचि ना कधीं । हरि भवव्याधि केंवि घडे

pashanacha dev bolechi na kadhin | hari bhavavyadhi kenvi ghade

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाषाणाचा देव बोलेचि ना कधीं । हरि भवव्याधि केंवि घडे ॥१॥ दगडाची मूर्ति मानिला ईश्वर । परि तो साचार देव भिन्न ॥२॥ दगडाचा देव इच्छा पुरवीत । तरि कां भंगत आघातानें ॥३॥ पाषाण देवाची करिती जे भक्ति । सर्वस्वा मुकती मूढपणें ॥४॥ प्रस्तराचा देव बोलत भक्तांतें । सांगते ऐकते मूर्ख दोघे ॥५॥ ऐशांचे माहात्म्य जे कां वर्णिताती । आणिज म्हणविती तेणें भक्त ॥६॥ परंतु ने नर पामर जाणावे । त्यांचे नायकावे बोल कानीं ॥७॥ धोंडा घडोणियां देव त्याचा केला । आदरें पूजिला वर्षें बहु ॥८॥ तरी तो उतराई होय केव्हां काई । बरवें ह्र्दयीं विचारा हें ॥९॥ धोंडापाण्याविण नाहीं देव कोठें । होतां सान मोठें तीर्थ क्षेत्र ॥१०॥ बाराशीचे गांवीं जाहला उपदेश । देवाविण ओस स्थळ नाहीं ॥११॥ तो देव नामया ह्रदयीं दाविला । खेचरानें केला उपकारु हा ॥१२॥