भजनी मालिका
← भजनांकडे परत

परमामृत सागरु मथुनियां पुरता । काढिला तत्त्वतां ज्ञानबोधु

paramamrut sagaru mathuniyan purata | kadhila tattvatan dnyanabodhu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परमामृत सागरु मथुनियां पुरता । काढिला तत्त्वतां ज्ञानबोधु ॥१॥ या सुखाचा पारु जाणते विरळे । घेताती गळाळे संतजन ॥२॥ प्रेमाचिये ताटीं वोगरु सुखामृत । हें सुख त्वरित सेवा आधीं ॥३॥ हें सुख सेवितां परमानंद धणी । कृपा संतजनीं केली पूर्ण ॥४॥ ज्ञानाचें अंजन लेईले संतजन । जनीं जनार्दन देखती सदा ॥५॥ नाहीं भिन्न भेद सर्व ब्रह्म एक । ब्रह्मांडनायक अनंत कोटी ॥६॥ दीपांचा दीपक ह्रदय आत्मज्योती । विश्वीं विठ्ठलमूर्ती देखती सदा ॥७॥ हें सुख दिधलें भक्तांसी विश्रांति । नामाची हे ख्याती परमानंद ॥८॥ पढतां नाम मंत्र ब्रह्मचि अवघें । पाहतां अनुभवें वेदमतें ॥९॥ तें हें विठठलनाम वेदाचें गव्हार । जाणती साचार संतजन ॥१०॥ युगें अठ्ठाविस विठठनामें जपतु । हा पुंडलीक भक्तु महामुनी ॥११॥ उघडली मांडूस भक्तिभाव तारुं । विठठल उद्धारु कलियुगीं ॥१२॥ न लगती सायास करणें उपवास । विठठलनामें पाश तुटती जाणा ॥१३॥ आदि ब्रह्म जुनाट जपती सिद्ध मुनी । तें दिलें मंथोनि पुंडलिकें ॥१४॥ केशवनाम मंत्र नामया सांगितलें । विस्तारोनि केलें मंथन ऐसें ॥१५॥