भजनी मालिका
← भजनांकडे परत

परळी वैजनाथीं जगमित्र नागा । ध्यानीं पांडुरंगा आठवीत

parali vaijanathin jagamitra naga | dhyanin panduranga athavit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परळी वैजनाथीं जगमित्र नागा । ध्यानीं पांडुरंगा आठवीत ॥१॥ सर्वांभूतीं त्यासी दिसे वासुदेव । नाहीं दुजाभाव त्याचे मनीं ॥२॥ निद्य आणि वंद्य लेखितो सारिखे । पाहे ब्रह्मरूप सर्वत्रांसी ॥३॥ रात्रंदिवस करी हरीचें भजन । सुखें आनंदानें राहतसे ॥४॥ सज्जन हे त्यासी बहुत मानिती । दुर्जन द्वेषिती त्याज लागीं ॥५॥ परि त्याचे चित्ती वाटेना हें दु:ख । मानी प्रेमसुख आनंदानें ॥६॥ दुर्जनांनीं त्याच्या घरासी तो अग्नि । लाविला येऊनि रात्रीमध्ये ॥७॥ अग्नि मोठा तेव्हां प्रदिप्त तो झाला । वृत्तांत कळला सज्जनांसी ॥८॥ धांवुनी ते आले पाहती नयनीं । कांहो चक्रपाणी ऐसें केलें ॥९॥ तुजवीण कोण राखे यासी आतां । धांव तूं अनंता येचि वेळां ॥१०॥ पांडव राखिले लाक्षांतून जो हरी । तैसी करीं परी नागयासी ॥११॥ येथें नाहीं देवा कोणाचा उपाय । घालीं आतां घाय पांडुरंगा ॥१२॥ प्रल्हाद रक्षिला अग्नि तो माझारी । तैसी करीं परी त्यासी आतां ॥१३॥ ब्रीद हें सांभाळीं आपुलें अनंता । राखीं आतां भक्तां आपुलिया ॥१४॥ ऐकोनियां स्तुस्ति आले नारायण । शांत झाला अग्नि तेचि वेळां ॥१५॥ स्वस्थ असे नागा आनंदानें सुखें । पाहती सर्वलोक परळीचे ॥१६॥ सज्जन संतोष अंतरीं मानिती । धांवण्या श्रीपति धाविन्नला ॥१७॥ दुजेंनांचीं तेव्हां तोडें जाहलीं काळीं । साह्य वनमाळी भक्तालागीं ॥१८॥ चाहुर एक भूमी इनाम त्या दिली । पत्रिका लिहिली त्याच्या नांवें ॥१९॥ ग्रामवासी त्यासी पिकवुनी धान्य । देती तें नेऊन नाग्या घरीं ॥२०॥ वारसीक नेम चालविती लोक । आला नवा एक अमलदार ॥२१॥ करोनी पाहणी मागतसे सारा । नायके विचारा कोणाचिया ॥२२॥ तयासी उत्तर करिती ग्रामवासी । नवसिलें देवासी सर्वत्रांनीं ॥२३॥ जगमित्न नागा हरिचा तो भक्त । सांगती वृत्तांत त्याजलागीं ॥२४॥ याचे मनीं नाहीं कांहीं दुजा भाव । सर्वांभूतीं देव पाहतसे ॥२५॥ कृपावंत असे यासी चक्रपाणी । नका तुम्ही मनीं आणूं दुजें ॥२६॥ मनामाजी त्यानें केला तो विचार । पाहूं चमत्कार याचा आतां ॥२७॥ जगमित्र नागा त्यानें बोलाविला । बोलता त्या झाला सुभेदार ॥२८॥ आमुचिया घरीं मुलींचें तें लग्न । व्याघ्राचें कारण असे आम्हां ॥२९॥ घेऊनियां आतां यावा तुम्ही व्याघ्र । म्हणवितां जगमित्र पाहूं कैसें ॥३०॥ व्याघ्ररूप असे माझा नारायण । येतों मी घेउनी आतांची हा ॥३१॥ आनंदानें नागा निघाला तेथुनी । आला असे वनीं अरण्यांत ॥३२॥ धांवूनियां तेथें आले पांडुरंग । पुसतसे अंगें त्याजलागीं ॥३३॥ कोठें जासी बापा घोर अरण्यांत । भय असे तेथें श्वापदांचें ॥३४॥ मारतील तुज फिर तुं माघारी । येरु म्हणे हरि रक्षीं आम्हां ॥३५॥ सुभेदार माझा असे परम मित्न । पाहिजे हा व्याघ्र त्याजलागीं ॥३६॥ येरु म्हणे सुभेदार आहे नष्ट । काय त्याची गोष्ट ऐकसी तूं ॥३७॥ तया चांडाळासी वधितों मी आतां । झाला तो बोलतां जगन्मित्रा ॥३८॥ तूंचि हा चांडाळ बोलसी या गोष्टी । नको करूं कष्टी मित्र माझा ॥३९॥ जाय तूं वाटेनं आपुल्या या आतां । होतसे बोलतां उशीर मज ॥४०॥ व्याघ्र तेचि वेळां जाहले नारायण । धरी आलिंगुनी नागा त्यासी ॥४१॥ गळांत्याचे तेव्हां बांधिलें अंगवस्त्र । घेऊनियां व्याघ्र आला नागा ॥४२॥ भयाभीत झाले तेव्हां ग्रामवासी । लावियेया वेसी गांवीचिया ॥४३॥ ग्रामवासी यांनीं लावियेलें द्वार । करी सुभेदार विचार तेव्हां ॥४४॥ करीत गर्जना भयानक व्याघ्र । कांपती थरथर सकळ लोक ॥४५॥ जगमित्र नागा आला वेसीपासीं । उघडा द्वारासी हांका मारी ॥४६॥ ऐकोनियां कोणी न देती उत्तर । मोडियेलें द्वार व्याघ्रानें तें ॥४७॥ प्रवेशला नागा सुभेदारा घरीं । हांका त्यासी मारी यावें आतां ॥४८॥ करा करा कार्य सिद्धि घेऊनियां व्याघ्र । हांका वारंवार मारीतसे ॥४९॥ द्वारपाळ त्याचे नुघडिती द्वार । मोडोनियां व्याघ्र शिरे आंत ॥५०॥ करीत गर्जना आपटूनि पुच्छ । जाहले भयाभीत सकळ लोक ॥५१॥ सुभेदार होता जया मंदिरांत । व्याघ्र नागा आंत गेले दोघे ॥५२॥ सुभेदार बोले द्वाराचे आंतून । देईं जीवदान मज आतां ॥५३॥ पतीत मी पापी तुझा शरणागत । होईं कृपावंत जगमित्रा ॥५४॥ कर जोडोनियां करितों विनंती । अज्ञानाची भ्रांति झाली मज ॥५५॥ वारंवार तुज घेतों लोटांगणीं । देई वा सोडोनी वनीं व्याघ्र ॥५६॥ कृपावंत साधु वर्णिताती वेद । करीं अपराध क्षमा माझा ॥५७॥ ऐकोनियां व्याघ्र गर्जना करीत भक्षावया धांवत त्याजलागीं ॥५८॥ जगमित्र नागा अवरीत त्यासी । चाल तूं वनासी मायबापा ॥५९॥ घेऊनियां व्याघ्र चालिला जगमित्र । पाहती सर्वत्र लोक तेव्हां ॥६०॥ भक्तांनीं जिंकिला भाव बळें देव । घालीतसे धांव संकटीं तो ॥६१॥ संतांचा महिमा न वर्णवे कांहीं । जाहला लीन पायीं नामदेव ॥६२॥