भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुण नामाची अनंत कल्पना । धरुनि नारायणा व्यक्ति येसी

nirgun namachi anant kalpana | dharuni narayana vyakti yesi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निर्गुण नामाची अनंत कल्पना । धरुनि नारायणा व्यक्ति येसी ॥१॥ लाज लावियेली त्या निर्गुणपणा । श्रुतींच्या वचना वाखाणितां ॥२॥ तैसें न हो आम्ही करणीचे विलगत । नामाचे निकट दास तुझे ॥३॥ चतुरा शिरोमणी नंदाना खिल्लारी । हें अघटित मुरारी नाम जरी ॥४॥ तुमचे तुम्हां देवा सांगतां तें निकें । समर्थांसी रंकें बोलिजे केवीं ॥५॥ देवा मुगुटमणी हें बोलती पुराणें । आणि बळिचें राखणें द्वार काय ॥६॥ अर्जुना सारथी रथा वागविसी । उच्छिष्टें काढिसी धर्माघरीं ॥७॥ विश्वंभर नाम तुझें कमळापति । जगीं श्रुति स्मृति वाखाणिती ॥८॥ गौळियांचे घरीं दहीं लोणी चोरूनी । खातां चक्रपाणि लाजसीना ॥९॥ आतां दीनानाथ ब्रीद तुझें साचें । तरी भूषन आमुचें जतन करी ॥१०॥ येर ठेवा ठेवी कायसी आम्हां आतां । विनवितो नामा केशिराजा ॥११॥