भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयातें आम्हीं जेवविलें सांगातेम । हा दोष आम्हांतें ठेवा झणीं

namayaten amhin jevavilen sangatem | ha dosh amhanten theva jhanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामयातें आम्हीं जेवविलें सांगातेम । हा दोष आम्हांतें ठेवा झणीं ॥१॥ सर्वत्र चाळक एकचि चैतन्य । वंद्य निंद्य कोण म्हणे स्वामी ॥२॥ पुण्यपाप बाधा आम्हां नाहीं कदा । असो शुद्धबुद्धा निरंतर ॥३॥ देह म्हणाल जरी वोडंबर पांचांचें । अंबरीं आभासाचें अभ्र जेवीं ॥४॥ नामा ऐसें नाम कवणिया अवयवां । सांगा तुम्ही देवा साच करोनी ॥५॥ तेजीं कीं जीवनीं गगनीं कीं पवनीं । कीं दोष धरणीमाजीं होता ॥६॥ तो तुम्हांसी गोचरु जाला कवणें युक्ति । हे खूण निरुती सांगा मज ॥७॥ तुम्हीं वेदवक्ते सर्वशास्त्र द्रष्टे । परि नाहीं आत्मनिष्ठे पावलेती ॥८॥ भेदभ्रम तुमचा नाहीं मावलला । भ्रमुची उरला संदेहेसी ॥९॥ जे वेळीं संकल्प सोडिला पैं येणें । तुम्ही आपोशनें घेतलीं कैसीं ॥१०॥ ते वेळीं नाहीं केली ही विचारणा । अधिकार अन्ना आहे कीं नाहीं ॥११॥ याचिलागीम तुम्हां प्रार्थुनी खूण सांगे । नामयाच्या प्रसंगें घडली सेवा ॥१२॥ आशिर्वद तुम्हीं दिल्या मंत्राक्षता । त्या त्याचे माथा टाकियेल्या ॥१३॥ मज निरालंबासी तुम्हीं करोनि अवलंबन । निष्कामासी पूर्ण केलें काम ॥१४॥ हें माझें बोलणें तुम्हीं ऐकोनि सकळिकीम । परी अझुनी ओळखी न धरा माझी ॥१५॥ निःसंदेह भोजन केलें आधि तुम्हीं । उरले शेष आम्हीं स्वीकारिलें ॥१६॥ यासी विधियुक्त कोण प्रायश्चित । सांगा कोण ग्रंथ साच करुनी ॥१७ या हरिदासाचे रज आणि तुमचें चरणतीर्थ । तेणेंचि पुनीत तनु माझी ॥१८॥ येरु तुमचा भावो तोचि फळला तुम्हां । नामा तरी आम्हाम निष्कलंकु ॥१९॥