भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामदेव घरीं पाहुणे मेहुणे । आले दोघेजण पंढरिसी

namadev gharin pahune mehune | ale doghejan pandharisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामदेव घरीं पाहुणे मेहुणे । आले दोघेजण पंढरिसी ॥१॥ राजाईनें बंधु देखुनि दृष्टिसी । उल्हास मानसीं थोर जाला ॥२॥ कडकडूनि भेटि लोभाची आवडी । टाकली घोंगडी बैसावया ॥३॥ भ्रतार लागले विठोबाचे ध्यानीं । संसाराची मनीं आस्थ नाहीं ॥४॥ नाचतो निर्जज्ज होऊनि निःशंक । सांडिला लौकिक देहभाव ॥५॥ ऐसें जंव सांगे राजाई बंधुसी । तंव आले घरासी नामदेव ॥६॥ तयासी सोयरे अभ्युत्थान देती । न भेटे तयासी विष्णुदास ॥७॥ देखुनी कांतेसी क्रोध आला फार । असोनि संसार नाहीं आम्हां ॥८॥ अगडधूत येती घेऊनि टाळविणा । लागे त्यांचे चरणा वेळोवेळां ॥९॥ जन्मामध्यें आले माझे सहोदर । न बोले उत्तर त्यांसी कांहीं ॥१०॥ भोंदु घरीं येती हरिनामें गर्जती । धुवुनि त्यांचें पिती पायावणी ॥११॥ माझे सखे बंधु घरा आले बाई । रामराम तोहि न घे त्यांचा ॥१२॥ नामा म्हणे कांते राम ह्रदयांत । सांठवुनी तृप्त जालों आम्ही ॥१३॥