भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचा महिमा नेणेची पैं ब्रह्मा । म्हणोनियां कर्मा अनुसरला

namacha mahima nenechi pain brahma | mhanoniyan karma anusarala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामाचा महिमा नेणेची पैं ब्रह्मा । म्हणोनियां कर्मा अनुसरला ॥१॥ नाम हेंचि कर्म नाम हेंचि धर्म । केशव हेंचि वर्म सांगितलें ॥२॥ नाम सुद्ध स्नान नाम शुद्ध संध्या । नामाविणें वेद आणिक नाहीं ॥३॥ करितां आचमन केशव नारायण । करिती उच्चारण आधीं हेंचि ॥४॥ लग्नाचिये काळीं म्हणती सावधान । लक्ष्मीनारायण चिंतन करा ॥५॥ देहाचिये अंती प्रायश्चित्त देती । शेवटीं वदविती रामनाम ॥६॥ ऐसिया नामापरतें नाहीं सार । गिरिजेसी शंकर उपदेशी ॥७॥ करिती पितृश्राद्ध कर्म आचरती । शेवटीं म्हणती एको विष्णु ॥८॥ नामें होय गति नामें होय मुक्ति । नामयाचे चित्तीं रामनाम ॥९॥