भजनी मालिका
← भजनांकडे परत

मारिले ते वीर माव करि करी । मृषा ते वैखरी केली जगीं

marile te vir mav kari kari | mrusha te vaikhari keli jagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मारिले ते वीर माव करि करी । मृषा ते वैखरी केली जगीं ॥१॥ पण केला होता न धरीं शस्त्रासी । भीष्म तो तयासी स्मरणवंत ॥२॥ महामारी धरी अर्जुन वीरासी । नये सावरासी कांहीं केल्या ॥३॥ अश्व ते मारिले रथ ते सारिले । घाय वरी केले वीर पार्था ॥४॥ पार्थाचें शरीर पुष्प पळसाचा । ऐसा वर्ण त्याचा जाणोनियां ॥५॥ सावध तो नाहीं वीर रणांगणीं । विचारिलें मनीं जगन्नाथें ॥६॥ नाहीं पळ एक सावध हा वीर । बाणांचे ते भार भीष्म टाकी ॥७॥ देखोनि निदान प्रतोद ठेवून । प्रथित हो रथचक्र होतें ॥८॥ घेऊनियां करीं उठे लागवेगें । धांवतां निजांगें देखियेलें ॥९॥ कसे पितांबर सुटला तो करें । सांवरून वरें धांवतसें ॥१०॥ भीष्म म्हणे देवा माझी सत्य केली । प्रतिज्ञा हरली आपुली हो ॥११॥ जरी तुझे चित्तीं असे तें मारणें । कवण तो रक्षण करील माझें ॥१२॥ येऊनि लवकरी बैसे रथावरी । खड्‌ग तुझ्या करीं देत आहें ॥१३॥ ऐकतां हा बोल झाला लज्जामान । दिलें तें टाकून चक्र हातें ॥१४॥ जयजयकार झाला रणी तो भीष्माचा । पण केला साचा देवराया ॥१५॥ नामा म्हणे ऐसी भक्ताची हो चाड । आपण लबाड झालें देव ॥१६॥