भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग व्यासपूजा सारिली । तैसीच वाल्मिकाची केली

mag vyasapuja sarili | taisich valmikachi keli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग व्यासपूजा सारिली । तैसीच वाल्मिकाची केली । वसिष्ठादिकीं अंगिकारिली । समस्त ऋषि पूजियले ॥१॥ धन्य धन्य धरातळीं । येऊनियां देवीं सकळीं । माजीं सहित वनमाळी । आळंकापुरीं नगरीये ॥२॥ मग साठी तीनशें गंगा । माजी शिव द्वादश लिंगा । अष्टोत्तर तीर्थें समर्थें पैं गा । तिहीं स्तवन आरंभिलें ॥३॥ कोटी तीर्थांचा रहिवास । अष्टभैरव सावकास । वसू कोटि गणेश । साठीसहस्त्र गणासहित ॥४॥ ऐसे रहिवासले षण्मास । दिव्यद्रुमफळें प्रतिदिवस । दिव्य अन्नें सावकाश । अमृत भक्षिती देव ॥५॥ ऐसा सकळ तीर्थांचा मेळा । तयामाजीं परब्रह्म पुतळा । करी ज्ञानदेवाचा सोहळा । आळंकापुर नगरिये ॥६॥ गरुड हनुमंता ऐसे । पुढें कामारी ह्रषिकेशें । साक्षात वसिजे महेशें । गौरीसहित आळंकापुरीं ॥७॥ नंदि श्रृंगी त्राहाटण । प्रतिदीनीं विभूतीचे उधळण । जयजय शंकर शिव पूर्ण । ऐशीं स्तोत्रें गाताती ॥८॥ महा सभास्थळ वैकुंठ । सभे श्रेष्ठ वैकुंठपीठ । आणि शिवमूर्ती घनदाट । नीलकंठ सभेसी ॥९॥ रंभा उर्वशी नाचती । नारद तुंबर वीणे वाती । गणेश सारजा आळविती । सा राग एकवीस मूर्च्छना ॥१०॥ ऐसा रंग स्थिरावला । जयजयकारेम घोष केला । तेणें चवकोनि उठला । पाताळींचा शेष ॥११॥ ऐकोनी विष्णुकीर्तन । तयासी आलें पैं स्फुंदन । मग उच्चारित रामकृष्ण । मृत्युलोकासि आला ॥१२॥ सहस्त्र वदनें स्तुति करी । हर नमस्कारिले हरी । वाहुनि तुळसीमंजिरी । ज्ञानदेवा पूजियेलें ॥१३॥ नामा म्हणे ज्ञानउदयो । ज्ञानदेवा भाग्याचा पहा हो । आपण येऊनि वैकुंठरावो । समाधि दिधली जिनहस्तें ॥१४॥