भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणी एके दिवशीं श्रीकृष्ण अंगणीं । विलोकी नयनीं प्रतिबिंब

koni eke divashin shrikrushna anganin | viloki nayanin pratibimb

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कोणी एके दिवशीं श्रीकृष्ण अंगणीं । विलोकी नयनीं प्रतिबिंब ॥१॥ मातेप्रती तेव्हां ह्मणतसे हरी । काढोनि झडकरी देईं मज ॥२॥ माता ह्मणे बाळा नये तें काढितां । आणीक अ-नंता माग कांही ॥३॥ ऐसें ऐकोनियां मागतसे हरी । त्यासी नानापरी समजावित ॥४॥ बहुत खेळणीं पुढें ठेवी माता । परी तो रडतां न राहेची ॥५॥ पालखीं नेऊनि हरीसी निजवीत । यशोदा ते जात स्वकार्यासी ॥६॥ तेच समयीं राधा आलीसे मं-दिरीं । देखिला श्रीहरी रडतां तिनें ॥७॥ पालखा जवळी जाऊनि सत्वर । घेत कडेवरी हरिलागीं ॥८॥ राधा म्हणे कां तूं रडतोसी चाटा । गोष्टी त्या अचाटा सांगतोसी ॥९॥ ऐसें ऐकोनियां उगाची राहिला । खेळवी हरिला प्रेमें राधा ॥१०॥ मागुती नेऊनि पालखां घातला । रडाया लागला हरी तेव्हां ॥११॥ राधेसी म्हणत यशोदा सुंदरी । यासी क्षणाभरी नेईं आतां ॥१२॥ आपले मंदीरा घेऊन जाय यासी । ऐकोनि मानसीं संतोषली ॥१३॥ नामा म्हणे राधा घेऊन हरीसी । गेली मंदिरासी आपुलिया ॥१४॥