भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां तें युद्ध नव दिवस झालें । संकट पडलें पांडवांसी

karitan ten yuddha nav divas jhalen | sankat padalen pandavansi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
करितां तें युद्ध नव दिवस झालें । संकट पडलें पांडवांसी ॥१॥ एक वेळ ऐसी केली मात भारी । नेम दिवस सारी एक बाकी ॥२॥ संग्रामीं पांडव करितां विचार । चिंतातूर फार देखोनियां ॥३॥ तेव्हां कृष्ण म्हणे चला अवघे जन । भीष्मा लागोन विचारासी ॥४॥ कृष्ण परमात्मा धर्मराजासहित । भीष्म शिबिरांत जाते झाले ॥५॥ करूनि वंदन पितामहालागीं । बोलती ते वेगीं कैसी परी ॥६॥ नेम दिवस दाहा त्या माजी ते नव । झाले ते स्वभावें कांहीं नव्हे ॥७॥ जयाचिया कांक्षा धरूनि तें मनीं । आलों समरांगणीं हेचि ठावें ॥८॥ तुजसीं झुंजतां नये यश आम्हां । तुझी ते महिमा अगाध हो ॥९॥ भार्गव राम बळी युद्धीं जिंकवेना । तया तोषवेना युद्ध बळें ॥१०॥ ऐसी यासी कैसें मारावें तें रणीं । न करितां हो येक्षणीं जय कैसा ॥११॥ याचि हो विचारें आलों तुझ्या घरीं । सांगें जय नरा प्राप्ति घडे ॥१२॥ ऐकोनियां बोला मनीं आनंदला । भीष्म महा भला काय बोले ॥१३॥ जोंवरी जीवंत तोंवरी जयवंत । आहे हें निश्चित कळों आलें ॥१४॥ परंतु पुसतां विचार मजला । तरी ऐका बोला सांगिजतो ॥१५॥ तुमची हो दळीं शिखंडी नामक । राजा नपूंसक पुरुष आहे ॥१६॥ तया करा पुढें मागून अर्जुन । बाणांचें संधान करावें कीं ॥१७॥ माझी ते प्रतिज्ञा षंढावरी शस्त्र । न धरीं तें अस्त्र प्राण गेल्या ॥१८॥ ऐसी युक्ति करा रणीं मग मारा । यश येईल घरा आपेआप ॥१९॥ ऐकोनी विचार आले निजस्थाना । नामदेवीं जाणा विचार केला ॥२०॥