भजनी मालिका
← भजनांकडे परत

कबीराचे घरीं आले संतजन । रात्र झाली जाण प्रहर एक

kabirache gharin ale santajan | ratra jhali jan prahar ek

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कबीराचे घरीं आले संतजन । रात्र झाली जाण प्रहर एक ॥१॥ उठोनी कबीर संतां नमन केलें । बैसावया दिलें तृणासन ॥२॥ कांतेसी म्हणत संत उपवासी । यासी भोजनासी घालावें हो ॥३॥ अवश्य म्हणे कांता एक युक्ति करा । कमाल दुसरा घेऊनि संगें ॥४॥ ऐशा समयांत वाणी ते निद्रिस्थ । चला जाऊ येथें चोरीलागीं ॥५॥ चोरूनियां धान्य घेऊनियां यावें । संतांसी वालावें भोजनासी ॥६॥ घेऊनियां शस्त्र उभयतां निघाले । घर तें फोडिलें वाणियाचें ॥७॥ प्रथम देखिली द्रव्याची ते रासी । नये उपयोगासी अमुचिया ॥८॥ पुढें तें देखिलें डाळ आणि पीठ । आनंदलें मोठें मन त्याचें ॥९॥ सर्वही साहित्य होएं वाण्या घरीं । कमाल अंतरीं संतोषला ॥१०॥ संतांचे पुरती सामीग्री घेतली । मोट ते बांधिली बरी तेणें ॥११॥ घेऊनियां मोट गवाक्षद्वारें । कबीराचे करें दिली तेणें ॥१२॥ मोकळ्या पडल्या द्रव्याचिया रासी । सावध वाण्यासी करूनि येतों ॥१३॥ योवोनी कमाल वाणियासी बोले । सांभाळ आपुलें द्रव्य आतां ॥१४॥ आइकोनी शब्द वाणी जागा झाला । कमाल चालिला तेथूनियां ॥१५॥ तांतडीनें निघतां गवाक्षाचें द्वारें । अर्ध तें शरीर गुंतलेंसे ॥१६॥ त्वरें करोनियां वाणी तो धांवला । कमाल धरिला पायीं तेणें ॥१७॥ तेव्हां तो कमाल म्हणे कबीरासी । न सोडी मजसी वाणी आतां ॥१८॥ आतां ताता तुम्ही कापा माझें शीर । जावें हो सत्वर धांवोनियां ॥१९॥ न कापितां शीर होईल फजिती । घरासी न येती संत कोणी ॥२०॥ खरें मानूनियां काढियेलें शस्त्र । कापियेलें शीर कमालाचें ॥२१॥ त्वरें करोनियां कबीर चालिला । आश्रमासी गेला आपुलिया ॥२२॥ झाला जो वृत्तांत सांगे कांतेलागीं । येरी म्हणे वागीं बरें केलें ॥२३॥ धन्य तो कमाल धन्य त्याची भक्ति । देह संतांप्रती अर्पियेला ॥२४॥ याचा खेद स्वामी न धरावा चित्ता । सामोग्री हे संतां अर्पा तुम्ही ॥२५॥ देवोनी सामोग्री संतांसी तो म्हणे । करावे भोजन स्वामी आतां ॥२६॥ घेवोनि सामोग्री केलेंसे गलबला । चोर धरियेला धांवा धांवा ॥२८॥ धांवोनियां आले नगरीचे लोक । पाहाती अनेक तयालागीं ॥२९॥ रुंड असे तेथें त्यासि नाहीं शीर । करिती विचार एकमेक ॥३०॥ म्हणती वाण्यासी काय तुझें नेलें । शोधोनी पाहिलें मग त्यानें ॥३१॥ सर्वस्वही आहे नेलें डाळ पीठ । साहित्य तें मिष्ट भोजनाचें ॥३२॥ श्रुत झाली वार्ता गांवींच्या राजाला । म्हणे त्या चोराला शूळीं घाला ॥३३॥ राजदूत तेव्हां आले धांवोनियां । रुंड घेविनियां चालिले ते ॥३४॥ शूळ तो रोंविला भागीरथी तीरीं । रुंड तयावरी घातलें तें ॥३५॥ पाहाती ते जन सर्व नामरीक । करील कवतुक पांडुरंग ॥३६॥ कबीरासी संत आशिर्वाद देत । कृपा सादोदित असों द्यावी ॥३७॥ वैष्णवांचा मेळा पुसोनि चालिला । कबीर निघाला बोळवीत ॥३८॥ करिती गजर हरिच्या नामाचा । पंथ भागिरथीचा धरिला त्यांनीं ॥३९॥ भागिरथी तीरीं रोंविलासे शूळ । नयनीं सकळ पाहाती संत ॥४०॥ शूळावरी रुंड देखिलें नयनीं । हात जोडुनी दोन्ही नमस्कारी ॥४१॥ सर्वत्रीं देखलें आपुलिया डोळां । जीव निर्जिवाला आला कैसा ॥४२॥ वैष्णव पुसती कभीरालागोनी । विपरीत करणी कैसो झाली ॥४३॥ तेव्हां तो कबीर बोलतसे संतां । चोर हा देखिला हरिभक्त ॥४४॥ तुम्हांपाशीं त्याचें गुंतलें संचित । म्हणूनि दंडवत केलें त्यानें ॥४५॥ तंव त्या संतांनीं घेतलीसे आळी । उठवीं वनमाळी यासी आतां ॥४६॥ तंव त्या कबीरें श्रुत केलेई वार्ता । तेव्हां त्या हो संतां समजलें ॥४७॥ तेव्हां ते वैष्णव बोलती सकळ । आणा शिरकमल तुम्ही येथें ॥४८॥ इकडे मातेनें कमालाचें शीर । घेवीनी धणीवर पाहे द्दष्टी ॥४९॥ म्हणे धन्य बाळा येउनी पोटाशी । उभय कुळांसी उद्धरिलें ॥५०॥ संतांचिया कजा वेंचिलासी प्राण । जगीं तूंचि धन्य म्हणविलें ॥५१॥ वैकुंठींचा वासी झालासी मिरासी । आम्हां पतितांसी सोडियेलें ॥५२॥ तुजसवें मज जावें बा घेवोनी । करी विनवणी पांडुरंगा ॥५३॥ तुजविण मज न गमे सखया । येईं तूं तान्हया धांवोनियां ॥५४॥ हरणी चुकली जैसी कां पाडसा । दश दिशा ओसा तिजलागीं ॥५५॥ तैसें मज झालें न गमेचि कांहीं । भेट माझे आई कमाला तूं ॥५६॥ काय तुझे गुण आठवूं मी आतां । सत्त्वधारी सुता कबीराच्या ॥५७॥ नाशवंत देह त्याचा केला त्याग । धन्य हें वैराग्य तुझें बापा ॥५८॥ ऐसी तेही माया कारेतसे शोक । अकस्मात्‌ देखे कबीराला ॥५९॥ झालें वर्तमान सांगितलें तिसी । चिंता हे मानसीं करूं नमो ॥६०॥ वेगीं देईं शीर उठला कमा ल । संतांचा हा बोल सत्य असे ॥६१॥ सभळित शीर घेउनी कबीर । संतांचिया करें दिलें तेव्हां ॥६२॥ उतरुनी रुंड वैष्णवांनीं शीर । ठेविलें झड करी नामघोषें ॥६३॥ भावाचा तो देव भक्तीचा अंकिला । कमाल उठिला तेचि वेळीं ॥६४॥ हरि नामघोषें करुनि गजर । संतां नमस्कार केला तेणें ॥६५॥ ऐसें सकळ जनीं पाहिलें कौतुक । संतांचा अधिक महिमा असे ॥६६॥ नामा म्हणे त्याचा होईन मी दास । शरण तयांस वारंवार ॥६७॥