भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोहारियाचे पुढें मांडियेलें रत्न । आतां मोला उणें येईल कैसें

johariyache pudhen mandiyelen ratna | atan mola unen yeil kaisen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जोहारियाचे पुढें मांडियेलें रत्न । आतां मोला उणें येईल कैसें ॥१॥ तैसें थापटणें पारखियाचा हात । वाफ जाल्या घात वायां जाती ॥२॥ प्रथम थापटणें निवृत्तीच्या माथा । डेरा जाला निका परब्रह्म ॥३॥ तेंचि थापटणें ज्ञानेश्वरावर । आतां कैंचें कोरें उरे येथें ॥४॥ तेंचि थापटणें सोपानाचे डोईं । यांत लेश नाहीं कोरें कोठें ॥५॥ तेंचि थापटणें मुक्ताबाईला हाणी । अमृत संजिवनी उतूं आली ॥६॥ तेंचि थापटणें नामदेवावर । डोई चोळूं मोहरे रडों लागे ॥७॥ गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई । सुन्नेभरि नाहीं भाजियेला ॥८॥