भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपिका ह्मणती यशोदा सुंदरी । करितो मुरारी खोदी बहु

gopika hmanati yashoda sundari | karito murari khodi bahu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोपिका ह्मणती यशोदा सुंदरी । करितो मुरारी खोदी बहु ॥१॥ यशोदेप्रती त्या गौळणी बोलती । संकष्ट चतुर्थी व्रत घेई ॥२॥ गणेश देइल यासी उत्तम गुन । वचन प्रमाण मानावें हें ॥३॥ गजवदनासी तेव्हं म्हणत यशोदा । माझिया मुकुंदा गुण देईं ॥४॥ ऐसें हें वचन ऐकुन कृष्णनाथें । सत्य गणेशातें केलें तेहं ॥५॥ एक मास खोडी देवें नाहीं केली । प्रचीत ते आली यशोदेसी ॥६॥ धन्य धन्य देव गणपती पाहे । यशोदा ती राहे उपवासी ॥७॥ इंदिराबंधूचा उदय होऊं पाहात । यशोदा करीत पूज-नासी ॥८॥ शर्करमिश्रित लाडू येकवीस । आणीक बहुवस मोदक ते ॥९॥ ऐसा नैवेद्याचा हारा तो भरुनी । दे-व्हारां नेऊनि ठेवी माता ॥१०॥ मातेसी म्हणत तेव्हां ह्लषिकेशी । लाडू केव्हां देसी मजलागीं ॥११॥ यशोदा म्हणत पूजीन गजवदना । नैवेद्य दाऊन देईन तुज ॥१२॥ ऐसें म्हणूनियां माता बाहेर गेली । देव्हार्‍याजवळी हरि होता ॥१३॥ एकांत देखोनी हारा उचलिला । सर्व स्वाहा केला एकदांची ॥१४॥ घेऊनियां ग्रास उगाची बैसला । भक्तांलागीं लीला दावीतसे ॥१५॥ धूप घेवोनियां आली सदनातें । रिता हारा तेथें देखियेला ॥१६॥ विस्मय बहुत मातेसी वाटला । नैवेद्य हरीला पुसतसे ॥१७॥ कृष्ण म्हणे सत्यवचन मानीं माते । एक सहस्र उंदीर आले येथें ॥१८॥ त्यांत एक थोर होता तो मूषक । वरी विनायक बैसलासे ॥१९॥ सकळीक लाडू सोंडेनें उच-लीले । सर्व आकर्षिले एकदांची ॥२०॥ सर्वांगासी त्याणें चर्चिला शेंदूर । सोंड भयंकर हालवितसे ॥२१॥ उंदीर भ्यासुर भ्यालों मी देखून । वळली वदनीं बोबडी ते ॥२२॥ न बोलवे कांहीं माझेनी जननी । क्षुधा मजलायोगी लागलीसे ॥२३॥ लाडू मज देईं ह्मणे जनार्दन । माता क्रोधें करून बोलतसे ॥२४॥ माता ह्मणे कृष्णा पाहूं तुझें वदन । लाडू त्वांचि पूर्ण भक्षियेले ॥२५॥ हरि ह्मणे माते लाडू ते बहुत । मातील मुखांत कैसे माझ्या ॥२६॥ गणपति सर्व लाडू गेलासे घेऊन । आलें विहरण मजवरी ॥२७॥ हरी ह्मणे मज मारूं नको माते । तुज वदनातें दावीतों मी ॥२८॥ कृष्ण-नाथें तेव्हां मुख पसरिलें । ब्रह्मांडें देखिलीं मुखामाजी ॥२९॥ असंख्य गणपती दिसती वदनीं । पाहातसे नयनीं यशोदा ते ॥३०॥ मुखांत गणपति मातेसी बोलत । पूजावें त्वरित हरिलागीं ॥३१॥ ऐसें देखोनियां समाधिस्थ होत । चहूंकडे पाहात तटस्थ ते ॥३२॥ योगमाया तेव्हां हरीनें घालून । मातेपुढें जाण उभा असे ॥३३॥ यशोदा हरी कडेवरी घेत । मुखातें चुंबित आवडीनें ॥३४॥ हरि घेऊनियां घरासी ती गेली । भोजना बैसली नामा ह्मणे ॥३५॥