भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगनपंथें शुभ्र विमानें । देव लक्षिती अधोवदनें

gaganapanthen shubhra vimanen | dev lakshiti adhovadanen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गगनपंथें शुभ्र विमानें । देव लक्षिती अधोवदनें । तंव आळकापुरीं कीर्तनें । टाळ मृदांग झणत्कारले ॥१॥ जयजयकार क्षितीं होत । महादोषां संहार घात । नामा असे नाचत । पांडुरंगापुढें ॥२॥ रामकृष्ण अवतार । चरित्र गाती सविस्तर । वैष्णवीं केला जयजयकार । पांडुरंग म्हणितलें ॥३॥ ज्ञानदेव बैसले समाधी । पुढें आजान वृक्ष निधी । वामभागीं पिंपळ क्षितीं । सुवर्णाचा शोभत ॥४॥ निवृत्ती सोपान खेचर । ज्ञानदेव मुक्ताई साचार । हे उत्तर द्वारासमोर । बैसते जाले ॥५॥ देव म्हणे ज्ञानेश्वरा । चंद्र सूर्य जंव तारा । तुझी समाधि स्थिरा । राहो हे निरंतर ॥६॥ जंववरी हें क्षितीमंडळ । जंववरी हें समुद्र्जल । मग कल्पक्षी यथाकाळ । माझां ह्रदयीं ठसावें ॥७॥ आणिक एक सोपारें । ज्ञानदेव च्यार अक्षरें । जो जप करील निर्धारें । त्यासी ज्ञान होईल ॥८॥ ऐसा दिधला आशीर्वाद । मग संतासीम बोले गोविंद । ज्ञानदेवा ऐसा उद्‌बोध । दुजा न देखो दृष्टीसी ॥९॥ ज्ञाना म्हणे स्वामी माझा । अंगिकार केला वोजा । पावला भक्तांचिया काजा । गरुडारुढ होऊनी ॥१०॥