भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक ह्मणे धरी स्तन । याचे उपटीन कान

ek hmane dhari stan | yache upatin kan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एक ह्मणे धरी स्तन । याचे उपटीन कान ॥१॥ यशोदे तुला येईल राग । आपुल्या पोरा कांहीं सांग ॥२॥ अंधारीं लपत । पोरें करिती आकांत ॥३॥ सांगतसों शिकवणा । खोडी नको करूं कृष्णा ॥४॥ तोंड करूनि वांकडें । मला ह्मणे तशीच रडे ॥५॥ पोरां शिकवीत । गोरस आणारे समस्त ॥६॥ आह्मी निजलों समस्त । काजळ मुखासी लावीत ॥७॥ मेले आणूनियां सर्प । माझ्या पोरा दावी दर्प ॥८॥ योगियांचें नये लक्षा । त्यासी लावूं ह्मणती शिक्षा ॥९॥ अनंत गार्‍हाणीं । नामा ह्मणे कीर्ति वानीं ॥१०॥