भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोन्ही जोडुनि कर माथा ठेवी चरणीं । म्हणे परिसा विनवणी स्वामी माझी

donhi joduni kar matha thevi charanin | mhane parisa vinavani svami majhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दोन्ही जोडुनि कर माथा ठेवी चरणीं । म्हणे परिसा विनवणी स्वामी माझी ॥१॥ मी तंव अज्ञान न कळे तुमचा महिमा । अपराध क्षमा करा माझा ॥२॥ अंतरींची खूण कांहीं सांगा मज । जें तुम्ही ह्रदयीं बीज धरूनि असां ॥३॥ जेणें सुखें तुमचें चित्त निरंतर । आनंदें निर्भर सदा असां ॥४॥ इच्छा तृष्णा देहीं मानवली कल्पना । सदा समाधाना इंद्रियासी ॥५॥ मायबापें मज दिधलें तुमच्या हातीं । जन्मोनि सांगाति लावियेलें ॥६॥ देव द्विज गुरु साक्ष हे करुनी । स्वामीचे चरणीं जोडियलें ॥७॥ तुमची चित्तवृत्ति उदास देखोनी । पडिलें चिंतावनीं काय करूं ॥८॥ मग तुमचा स्वामी कृपेचा कोंवळा । न धरत पातला अनाथबंधु ॥९॥ मग त्या विश्वंभरें कृपेच्या सागरें । पुसिली आदरें तुमची गोष्टी ॥१०॥ तंव मी दुराचारें निर्भत्सिलें तुम्हां । ऐकोनि मेघःश्यामा करुणा आली ॥११॥ तंव तो जगज्जीवन बोले अमृतवाणी । लोटोनियां गोणी दाखंटा ॥१२॥ म्हणोनि हें द्रव्य तुम्ही सर्वहि वेंचावें । आणिक मागावें लागेल तें ॥१३॥ सद्‌‍गदित कंठें सांगितलें तुम्हां । परि न कळे मज महिमा दैवहीना ॥१४॥ लोभाचा वोरसु कोणिये जन्मींचा । नकळे तुमचा ऋणानुबंधु ॥१५॥ पाहतां श्रीमुख निवालें माझें चित्त । मग हे मनोरथ विसरले ॥१६॥ क्षण एक आनंद जाला माझे जिवीं । उपमा कवणे द्यावी तया सुखा ॥१७॥ आतां ये संसारीं मीच धन्य जगीं । जें तुम्हां अर्धांगीं विनटले ॥१८॥ परि मला एक वेळ घाला विठोबाचे पायीं । विनविते राजाई नामदेवा ॥१९॥