भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी कळलें गौप्यगुज । म्हणे रे नामया हेंचि चोज

devasi kalalen gaupyaguj | mhane re namaya henchi choj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवासी कळलें गौप्यगुज । म्हणे रे नामया हेंचि चोज । तो निजभाव सहज । प्रगट सांगूं आतां ॥१॥ कृतयुगीं क्षेत्र आदि । ज्ञानदेवा तेथेम समाधि । देव सांगतसे शुद्धी । योगबुद्धी जुनाट ॥२॥ ऐकें भक्तजनश्रेष्ठा । भूमिनामें वैकुंठपीठा । तें हें आळंकापुरीं श्रेष्ठा । आदि वरिष्ठा पीठा आठरा ॥३॥ आणिक ऐकरे वचन । हे पंचक्रोशी पुरातन । यासी युगें सांगता संपन्न । चतुरानन जाणतसे ॥४॥ कांहीएक किंचित सांगों । युगसंख्या मार्गांत रिघों । तरी वैवस्वत हाचि मागो । पूर्ण वोळंगो यापासोनी ॥५॥ मनु सहस्त्र युगें संख्या । तैं आळंकापुरीं आदि लक्षा । कोटी याग असंख्या । सहस्त्र दक्ष येथें जाले ॥६॥ आदि क्षेत्र संख्यारहित । ऋषमुनीं तपती सप्त । आणि नारदमुनि असे जाणत । हेचि पुरी पुरातन ॥७॥ नामा म्हणे कैसें दिधलें । हें ज्ञानासी सिद्ध लाधलें । हेंचि आम्हासी जोडलें । पूर्ण लाधलें पीयूष ॥८॥