भजनी मालिका
← भजनांकडे परत

दैत्य राजा थोर महा बळिवंत । जगीं तो विख्यात हिरण्यकश्यप

daitya raja thor maha balivant | jagin to vikhyat hiranyakashyap

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दैत्य राजा थोर महा बळिवंत । जगीं तो विख्यात हिरण्यकश्यप ॥१॥ करुनियां तप तोषवी ब्रम्हाया । मागे वर तया दैत्यराव ॥२॥ वरदान मागे नसावा तो मृत्यु । कवणाचे हातु देव सुरां ॥३॥ गंधर्व मानव सकळांचें भय । नसावें तिळप्राय कवणेकाळीं ॥४॥ दिवसां ना रात्रीं तिथीं हो नक्षत्रीं । अंतरिक्ष क्षितीं मरण नसो ॥५॥ घरीं राजधानीं चोहटा मंदिरीं । कवणे ते स्थळीं मृत्यू नसो ॥६॥ ऐसा वर मागे दिला ब्रम्हा देवें । तपाचे स्वभावें तयेकाळीं ॥७॥ वर मागूनियां हरियलें पद । देवांसहित इंद्र स्थान भ्रष्ट ॥८॥ तयेकाळीं देव लपोनियां हरी । स्तविती अंतरीं पाहीं पाहीं ॥९॥ देवराया आली कृपा ते समयीं । म्हणे सर्व होई काळयोगें ॥१०॥ तयाचे उदरीं भक्तराजराणा । प्रल्हाद सुजाणा होईल तो ॥११॥ तयासी छळितां पावेल शासन । हाचि भरवसेन नेम आहे ॥१२॥ नामा म्हणे देवें केलें समाधान । आनंदें निमग्न आले स्थाना ॥१३॥