भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोखामेळियानें पाजियेलें दहीं । पडों दिलें नाहीं उणें त्याचें

chokhameliyanen pajiyelen dahin | padon dilen nahin unen tyachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चोखामेळियानें पाजियेलें दहीं । पडों दिलें नाहीं उणें त्याचें ॥१॥ तयाचें चरित्र परिसावें सादर । करितों नमस्कार सतजनां ॥२॥ तयाची जे कांता तयाच सारिखी । भावार्थ नेटकी आवडीची ॥३॥ साधन द्वादशी आली एके काळीं । उठोनि प्रात :— काळीं काय बोले ॥४॥ उठीं उठीं कांते स्वयंपाक करीं । आतां येतील हरि पारण्यासी ॥५॥ तंव एक्या ब्राम्हणें आइकिली मात । तेणें दिवाणांत सांगितलें ॥६॥ दिवाणानें दूत उआठविले त्यासी । चोखामेळियासी धरूनि आणा ॥७॥ दूतीं जाऊनियां धरुनी आणिलें । म्हणे काय झालें चोखामेळा ॥८॥ विठोबासी दहीं पाजीत असतां । कांहो माझ्या हाता आंसडीलें ॥९॥ रडतो हा कांरे सभेसी पुसती । तो म्हणे वृत्तांत ऐसा झाला ॥१०॥ रुसूनियां विठो गेल म्हणऊनि । रडे दीर्घध्वनी करूनियां ॥११॥ म्हणती या महारानें देव बाटविला । जिवें मारायाला बैल जुंपा ॥१२॥ बांधोनियां पाय हांकियले बैल । धरूनि शिवळ विठो उभा ॥१३॥ उडती आसुड बइलांचे पाठी । मारितां हिंपुटीं थोर झाली ॥१४॥ तयाची ते कांता उभी राहूनियां । म्हणे देवराया हात काढी ॥१५॥ खाइलें जेविलें त्याचा हा उपकार । दुबळीचा भ्रतार मारूं पाहसी ॥१६॥ पाळिलें पोसिलें माझिया धन्याशी । उतराई झालासी ओढावया ॥१७॥ अन्नाची त्वां क्रिया नाहींरे राखिली । रांडकी त्वां केली चोखियाची ॥१८॥ काढीं हात आतां जाय परता उसण्या । जया पोट पोसण्या येथूनियां ॥१९॥ चोखा म्हणे रांडे विश्वाचा पोसणा । संतांचा देखणा विठो माझा ॥२०॥ जन लोक पुसती कोणा बोलतीस । ते म्हणे तुम्हांस काय दिसे ॥२१॥ अनंत ब्रम्हांडें जयाचे उदरीं । त्यानें चहूंकरीं धरियलें ॥२२॥ पीतांबरधारी घन:शाम मूर्ती । रखुमाईचा पति विठ्ठल हा ॥२३॥ समस्तांसी तेव्हां दिलें दरुशन । केलें समाधान नामा म्हणे ॥२४॥