भजनी मालिका
← भजनांकडे परत

चौदा भुवनें वसे ज्याचे पोटीं । त्यासी आणी जेठी मारावया

chauda bhuvanen vase jyache potin | tyasi ani jethi maravaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चौदा भुवनें वसे ज्याचे पोटीं । त्यासी आणी जेठी मारावया ॥१॥ इंद्रादि सुरवर जयाचे किंकर । त्यासी आणी पामर झोंबीसाठीं ॥२॥ अतुर्बळी तेव्हां दिसे नारायण । जळताती मनें वैरियांचीं ॥३॥ कंसाचे अंगणीं उभा असे देव । जैसा ज्याचा भाव तैसा भासे ॥४॥ कृष्णातें देखोनी वल्गना करिती । चोळिताती माती दंडालागीं ॥५॥ बळिभद्रासी खूण दावियेली तेव्हां । उशीर न लावा मारायासी ॥६॥ नामा म्हणे एक उरला असे कंस । वधती सकळांस दोघेजण ॥७॥