भजनी मालिका
← भजनांकडे परत

चतुर्भुज श्याममूर्ति । शंखचक्राची आकृती

chaturbhuj shyamamurti | shankhachakrachi akruti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चतुर्भुज श्याममूर्ति । शंखचक्राची आकृती । पीतांबराची दिव्य दीप्ति । पाडिली सृष्टीवरी ॥१॥ धन्य धन्य ज्ञानदेव । धन्य धन्य तो माधव । मग आरंभिला अनुभव । ज्ञानदेवाचेनि मुखें ॥२॥ देव म्हणे ज्ञानेश्वरा । तूं अवतरौनि माजि चराचरा । हरिला महादेषथारा । तुझेनि कवित्वें ॥३॥ तुझें कवित्व माझ्या गोष्टी । जो परिसेल हे सृष्टी । तो येईल माझे भेटी । वैकुंठा पीठीं विष्णूच्या ॥४॥ तुवां जो ग्रंथानुभव । गीतें सांगितला भाव । तें मुख्य ठेवणें राणीव । अनुभवीच जाणती ॥५॥ तैसाची अमृतानुभव । सिद्ध पीठ केलें भाव । दाउनी मनोहर राणीव । निज गुह्य आमुचें ॥६॥ वसिष्ठगीतेची टीका । भावार्थ काढिला श्लोका । ग्रंथ संचिला नेटका । करुनि रचना दाविली ॥७॥ तूं महाब्रह्मींचा अंश । पदपदांतरीं केला प्रवेश । दाऊनियां उदास विशेष । या जीवांसी तारिलें ॥८॥ तरी तूं आतां एक वेळ । माझी स्तुती करी निर्मळ । जेणें करुनि तरती सकळ । वक्ते श्रोते ग्रंथकार ॥९॥ नामा म्हणे परमानंद । पावोनियां उद्‌बोध । केला ज्ञानदेव सावध । स्तुती उपरती मांडिली ॥१०॥