भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुजंग विखार पवनाचा आहार । परि योगेश्वर म्हणों नये

bhujang vikhar pavanacha ahar | pari yogeshvar mhanon naye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भुजंग विखार पवनाचा आहार । परि योगेश्वर म्हणों नये ॥१॥ पवनाच्या अभ्यासें काया पालटी । परि तो वैकुंठीं सरता नहे ॥२॥ शुद्ध करी मन समता धरोनि ध्यान । तरीच भवबंधन तुटेल रे ॥३॥ पवित्र गंगाजळ मीन सेवी निर्मळ । परि दुष्ट केवळ कर्म त्याचें ॥४॥ अवचिता हेतु सांपडला गळीं । न सुटे तयेवेळीं तीर्थो-दकें ॥५॥ घर सांडोनियां वन सेविताती । वनीं कां नसती रीस व्याघ्र ॥६॥ काम क्रोध लोभ न संडवे मनीं । असोनियां वनीं कोण काज ॥७॥ बहुरुप्याचा नटा माथां भार जटा । भस्म राख सोटा हातीं दंड ॥८॥ धोति पोति कर्मावेगळा आदेसें । हुंबरत असे अंगबळें ॥९॥ त्रिपुंड्र टिळे अंगीं चंदनाची उटी । घालेनियां कंठीं तुळसी-माळा ॥१०॥ व्यापक हा हरि न धरिती चित्तीं । लटिकीयाची गति गातु असे ॥११॥ मीतूंपण जरी हीं दोन्हीं सांडी । राखिसी तरी शेंडी हेंचि कर्म ॥१२॥ मानसी तूं मुंडीं देहभाव सांडी । वासनेसी दंडी आत्ममयें ॥१३॥ मन हें दर्पण करोनि निर्मळ । पाहे पां केवळ आत्मास्वयें ॥१४॥ तुझा तूं केवळ तुजमाजी पाहीं । नामा म्हणे ध्यायी केशिराजु ॥१५॥