भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तजनवत्सल सुखसिंधुराशी । निर्भर मानसीं परमानंदें

bhaktajanavatsal sukhasindhurashi | nirbhar manasin paramananden

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्तजनवत्सल सुखसिंधुराशी । निर्भर मानसीं परमानंदें ॥१॥ सरिसे सकळ भक्त घेउनि पंढरिनाथ । चालिले अक्षत द्यावयासी ॥२॥ बाप तो कवतुकीं अनाथाचा नाथ । भोगिया श्रीमंत खेळू खेळे ॥३॥ तंव ते उदित भाग्य भाग्यवंत । दर्शनाचें आर्त होतें त्यासी ॥४॥ सकळही मिळोनि गेलें कुंडलतीर्थीं । तंव आले कमळापति दर्शनासी ॥५॥ तेथें देखोनियां सकळांचा मेळा । केला द्विजां सकळां प्रणिपातु ॥६॥ सांडोनि देहबुद्धि निःसंदेह व्हावें । कृपा करोनि यावें भोजनासी ॥७॥ पाळावें आपुल्या दिधल्या सत्यवचना । करावी वासना तृप्त माझीं ॥८॥ स्नानसंध्या विधि सारोनि समस्त । यावें शीघ्रवत नैवेद्यासी ॥९॥ ते निवाले दर्शनं तृप्त जाले मनें । परिसोनि वचनें अमृतोपम ॥१०॥ आम्ही तरी आश्रित हेंचि जाणा सत्य । आशिर्वाद नित्य देतों तुम्हां ॥११॥ सर्वभावें आमुचा करावा सांभाळ । स्वामी दीनदयाळ विश्व बोले ॥१२॥ तुम्ही महाराज राजराजेश्वर । पाहावें निरंतर कृपादृष्टी ॥१३॥ तुमचा हा आदर निरुपम सर्वथा । दिधलीसे मान्यता वेदवचना ॥१४॥ तें भाष्य आपुलें जतन सर्वभावें । साक्ष करुनी द्यावें प्रेम नाम्या ॥१५॥